राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी की एकनाथ शिंदेची? आज सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने या प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर आज आपला निर्णय राखून ठेवला. उद्धव ठाकरे गट, एकनाथ शिंदे गट आणि राज्यपाल यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती मुकेश आर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने ही सुनावणी केली.
यानंतर आता कुणीही युक्तिवाद करणार नाही. सुप्रीम कोर्टाने निकाल देखील राखून ठेवला आहे. निकाल कधी लागेल त्याबाबतची माहिती लवकरच समजेल. पण सुनावणीचा शेवट अतिशय रंजक झाला. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी या युक्तिवादाचा शेवट केला. त्यांनी शेवटच्या क्षणी संस्कृतमध्ये सुभाषित म्हणून युक्तिवादाचा शेवट केला. खरी शिवसेना कुणाची त्याचा निर्णय न्यायालय घेईल, असं म्हणत त्यांनी भावनिकपणे अपेक्षा व्यक्त केल्या.
ठाकरे गटाच्या बाजून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, देवदत्त कामत आणि अभिषेत मनुसिंघवी या तीनही वकिलांनी युक्तिवाद केला. ज्यांची याचिका दाखल असते त्याच पक्षाला शेवटच्या क्षणी कोर्टात रिजॉईंडर करण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे ठाकरे गटाच्या वकिलांना ती संधी मिळाली.