आकोट- संजय आठवले
राज्यातील नवीन सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे गुऱ्हाळ सुरू असून अकोला जिल्ह्यात आमदार रणधिर सावरकर तथा प्रकाश भारसाकळे या दोन आमदारांची नावे मंत्रीपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी असतानाच त्यात आता तिसरे आमदार हरीश पिंपळे यांचे नावाची भर पडली आहे. परंतु अकस्मात आमदार सावरकर यांना भाजपाचे प्रदेश सरचिटणीस पदाचे पारितोषिक मिळाल्याने “एक व्यक्ती एक पद” या न्यायाने मंत्रीपदाचे शर्यतीतून ते बाद झाले आहेत. त्यामुळे आता आमदार भारसाकळे की आमदार पिंपळे यापैकी कोणत्या भाग्यवान विजेत्याला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे.
विदर्भाचे राजकारणात अकोला जिल्ह्याला मानाचे स्थान आहे. अनेक ऐतिहासिक चळवळींचे केंद्र आणि असंख्य नामांकित नेत्यांची कर्मभूमी म्हणूनही अकोल्याचा मोठा लौकिक आहे. कधीकाळी हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या जिल्हा प्रवेशानंतर या वैभवाला उतरती कळा लागली. आणि हा जिल्हा हळूहळू भाजपाचे माहेरघर बनला. नाही म्हणायला जिल्हा परिषदेवर तेवढा ऍडव्होकेट आंबेडकरांचा ध्वज फडकत राहिला. गत विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यात नितीन देशमुख वगळता भाजपाचेच चार आमदार निवडून आले. त्यामुळे भाजप सेनेचे सरकार स्थापनेचे प्रयास सुरू असताना जिल्ह्यातून रणधीर सावरकर व प्रकाश भारसाकळे या आमदार द्वयांची मंत्री पदाकरिता फिल्डिंग लावणे सुरू होते. परंतु अचानक चित्र बदलले. आणि अकल्पितपणे आघाडी सरकार स्थापन झाले. त्याने मंत्रीपदा करता इच्छुक असलेल्यांचा चांगलाच विरस झाला.
परंतु पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राज्यातील राजकारणानेही कुस बदलली. त्यासोबतच सरकारचे चित्रही बदलले. सेनेच्या बंडखोर आमदारांसह भाजपाने विधानसभेवर कब्जा मिळविला. त्याने राजकीय महत्त्वाकांक्षांच्या निखार्यावरील राख झटकली गेली. अनेक राजकीय नेत्यांच्या आकांक्षा पुन्हा रसरशीत झाल्या. अकोला जिल्हाही ह्याला अपवाद नसल्याने हिरमुसलेले सावरकर व भारसाकळे ह्या आमदार द्वयांनी पुन्हा नव्या जोमाने लाल दिव्या करिता कंबर कसली. नवे सरकार अकोला जिल्ह्यात एक मंत्री पद देणार ही काळ्या कातळावरील पांढरी रेषा आहे. त्यातच जिल्ह्यात शिंदे गटाचा एकही आमदार नाही. त्यामुळे मंत्रीपदावर भाजपाचा निर्विवाद हक्क प्रस्थापित झाला आहे. परिणामी आमदार भारसाकळे आणि आमदार हरीश पिंपळे यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
ह्याची काही कारणे आहेत. ती अशी की, आमदार गोवर्धन शर्मा हे खुद्द मंत्री होण्यास राजी नाहीत, ” ठेविले अनंते……” म्हणत ते आहेत तेथेच समाधानी आहेत. विधान परिषदेचे वसंत खंडेलवाल यांना राजकीय वारसा असला, तरी ते नवखे आहेत. त्यामुळे त्यांनाही आताच मंत्रीपदाची अपेक्षा नाही. सर्वात तगडे स्पर्धक रणधीर सावरकर यांची प्रदेश सरचिटणीस पदी वर्णी लागलेली आहे. त्यामुळे “एक व्यक्ती एक पद” या न्यायाने तेही स्पर्धेतून दूर झाले आहेत. माजी मंत्री रणजीत पाटील यांचाही विधान परिषदेचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. त्यांची निवडणूक होऊ घातली आहे. मंत्रीपदाची खिरापत त्यांचे निवडणुकीपूर्वीच वाटली जाणार आहे. त्याने आमदार पाटील ही स्पर्धेत नाहीत. परिणामी मंत्री पदाकरिता दोनच स्पर्धक उरले आहेत. त्यात उजवा कोण? याची चाचपणी केली जाणार आहे.
तसे पाहू जाता, आमदार प्रकाश भारसाकळे हे कसलेले मुत्सद्दी व मुरलेले राजकारणी आहेत. त्यांचे पाठीशी अनुभवाची मोठी शिदोरी आहे. साथीला ज्येष्ठत्वाचा सन्मान आहे. सोबतीला मातब्बर नेते आहेत. अशातच त्यांनी काल-परवाच आकोट येथील त्यांचे निवासस्थानी झालेल्या बैठकीत आपणास मंत्रीपद मिळणार असल्याचे कार्यकर्त्यांना संकेत दिले आहेत. त्यामुळे मंत्रीपदी विराजमान होण्याचा बहुमान त्यांना मिळू शकतो. तर दुसरीकडे आमदार हरीश पिंपळे हे सुद्धा बरेच अनुभवी आहेत. पक्षात त्यांचेही हात वरपर्यंत आहेत. नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांचेही वजन त्यांच्याच पारड्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या पदाकरिता त्यांचाही विचार होऊ शकतो. ह्या सर्व बाजू पाहता आता भारसाकळे की पिंपळे याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.