आकोट- संजय आठवले
सालाबादप्रमाणे होणारी आकोट विधीज्ञ संघाची निवडणूक यंदाही होऊ घातली असून अध्यक्ष व सचिव या पदांकरिता होणाऱ्या या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत एकास एक अशा दोनच गटात ही निवडणूक होणार असल्याने दोन्ही गटांकडून जोरदार परंतु शांतीपूर्वक फिल्डिंग लावली जात आहे. सन २०२३ – २०२४ करिता होणाऱ्या अध्यक्ष सचिवाचा फैसला येत्या ४ सप्टेंबर रोजी होणार आहे.
आकोट न्यायालया अंतर्गत येणाऱ्या खकोट विधीज्ञ संघाची निवडणूक घोषित झाली आहे. ही निवडणूक अध्यक्ष व सचिव या दोन पदांकरिता होत असते. या निवडणुकीत एका गटाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ॲडवोकेट सुबोध पळसपगार तर सचिव पदाकरिता ॲडवोकेट सौ. राधिका देशपांडे यांना मैदानात उतरविले गेले आहे. तर दुसऱ्या गटाने अध्यक्ष पदाकरिता ॲडवोकेट मनोज वर्मा तर सचिव पदाकरिता ॲडवोकेट सुशील खवले यांचे नावाची घोषणा केली आहे. जुन्या, जाणत्या, वरिष्ठ व ज्येष्ठ विधीज्ञानी दोन्ही गटाकडून एकदम नव्या दमाचे युवा विधीज्ञ या निवडणुकीत पुढे केले आहेत.
आकोट विधीज्ञ संघाचे एकूण १३४ मतदार या निवडणुक मतदानात सहभागी होणार आहेत. वकिलांची निवडणूक असल्याने अर्थात या निवडणुकीत कुणाला काहीच समजावून सांगण्याची गरज नाही. त्यामुळे स्वभाव, कर्तृत्व आणि व्यक्तिगत संबंध या कसोट्यांवरच ही निवडणूक लढवली जाणार आहे. दिनांक ४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच्या दरम्यान मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच निकाल घोषित केला जाणार आहे. या निवडणुकीकरिता निवडणूक अधिकारी म्हणून ॲडवोकेट डी. एम. कुटे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲडवोकेट एस. के. पाठक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.