मूर्तिजापूर शहरात गेल्या अठरा दिवसापासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे. तर गेल्या पंचवीस वर्षापासून मूर्तिजापूर शहरातील पाणी प्रश्न अद्याप सुटला नसून तो भविष्यात कधी सुटणार की नाही? याची काही शाश्वती नाही मात्र विकासपुरुषाचा पोटापाण्याचा प्रश्न मात्र मिटला. या शहरासाठी भाजपचे आमदार यांनी शहरात विविध कामासाठी करोडो रुपयांचा निधी आणला असून मात्र पाण्यासाठी शून्य नियोजन असल्याचे दिसून येत आहे तर शहरातील पाणीपुरवठा गेल्या २५ वर्षात सुटला का नाही?. याबाबत कोणीच प्रश्न विचारणार नाही. पत्रकाराने जर प्रश्न लावून धरला तर त्याला हे लोक दम देतात. भाजपच्या आमदाराने पंधरा वर्षात केले तरी काय हा प्रश्न इथे नागरिकांना पडला आहे. शहरातील रस्त्यावर रस्ते बांधून कमिशनचा मलिदा लाटण्याचा काम कोण करते? कमिशन पोटी मुख्य रस्त्याचा सत्यानाश कोणी केला? हे जनतेला समजत आहे मात्र तोंडावर पट्टी लावल्याने तोंड उघडायला त्रास होतो. मात्र या निवडणुकीच्या वेळेस जे काम तोंडाने केले नाही ते बोटाने करणार असल्याचे समजत आहे. शहरातील नागरिक याबाबत मौन धारण केल्याने याचाच फायदा प्रतिनिधी घेत आहे तर गेल्या पंधरा वर्षात जर तुम्ही पाणी प्रश्न सोडवू शकले नाही येणाऱ्या पाच वर्षात तुम्ही काय करणार? हाही प्रश्न नागरिकांना पडला आहे.
पंचवीस तीस वर्षांपूर्वी मूर्तिजापूर हे पाण्यासाठी ओळखले जाणारे शहर होते. येथील रेल्वे स्टेशनवर विभागातील रेल्वे गाडीला पाणीपुरवठा या स्थानकावरून होत होता. तेव्हा शहरात मुबलक पाणीपुरवठा होत होता दररोज सायंकाळी पाण्याचा पुरवठा होत होता. मात्र नगरपालिकेने जसा हा पुरवठा आपल्याकडे घेतला तेव्हापासून लोकांची पाण्यासाठी दैना सुरु झाली. तेव्हा मूर्तिजापूर नगरपालिकेतील नोकरीच्या काही जागेसाठी हा पाणीपुरवठा आपल्या हाती घेतला आणि तेव्हापासूनच नळाचा अवधी हा तीन दिवस, पाच दिवस, पंधरा दिवसाचा वाढत गेला. तर निवडणुका जेव्हा येतात तेव्हा नागरिक पाण्याबाबत प्रश्न विचारताच हे भावी नगरसेवक मोठ गाजर देवून, आम्ही पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवू भाऊने सभागृहात प्रश्न मांडला. मात्र निवडणूक संपतात हम आपके है कौन? अशी भूमिका येथील नगरसेवक घेत होते मात्र बदनाम झालेले नगरसेवक यांना पुन्हा संधी येथील जनता देणार नाही. तुकाराम बिडकर यांच्या काळात एक पाणीपुरवठा योजना आणल्या गेली मात्र तेही अद्यापही पूर्ण झाली नाही आणि होईल की नाही याची पण शाश्वती नाही.
आता भर पावसाळ्यात मूर्तिजापूर शहराचा अठरा दिवसापासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे सर्व माजी नगरसेवक आक्रमक होऊन मुख्याधिकारीची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. मात्र जेव्हा हे सत्तेत होते तेव्हा काय झोपले होते? यांनी पाण्यासाठी कोणते नियोजन केले?. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खांबोरा बंधार्यावरील असलेल्या वाटर सप्लाय प्लांट मधील असलेल्या दोन्ही 240 केवीच्या मशीनच्या वाइंडिंग दुरुस्ती करून आणल्यावर काल वॉटर पंप सुरू केल्यावर काही तासातच दोन्ही मशीन यांचे संपूर्ण वाइंडिंग जळाले. यामध्ये नागरिकांचा काय दोष आहे?. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात गैरसोय आताच झाली काय?.