आकोट – संजय आठवले
पक्षविरोधी वर्तन केल्याचा आधार घेऊन अकोला महानगरातील सात पदाधिकाऱ्यांना भाजपातून सहा वर्षांकरिता निलंबित केल्याने आकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांचे भाजपातून केव्हा निलंबन होणार? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे अतिशय जिवंत पुरावे उपलब्ध असल्याबाबत दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना पुरेपूर कल्पना असूनही या निलंबन कारवाईतून भारसाखळे यांना मात्र वगळल्या जात असल्याने फडणवीस बावनकुळे यांचे दुटप्पी धोरणाची सर्वत्र चर्चा होत आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक आटोपली. निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला आता वेध लागले आहेत नवीन प्रांताध्यक्षांचे. ती घोषणा होण्यापूर्वी भाजपाने पक्षांतर्गत साफसफाईला सुरुवात केली आहे. त्याकरिता या निवडणुकीत पक्ष विरोधकांशी हात मिळवणी करून पक्षाच्या उमेदवारा विरोधात काम केल्याचे खापर फोडीत प्रतुल हातवळणे, गिरीश गोखले, उमेश गुजर, आशिष पवित्रकार, राजू टाकळकर, हरिभाऊ काळे व सौरभ शर्मा या सात पदाधिकाऱ्यांना भाजपने बाहेरचा रस्ता दाखविला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे हे सातही जण भाजपाचे कडवे समर्थक आणि अस्सल हिंदू आहेत.
त्यामुळे भाजपच्या ‘एक है तो सेफ है’ या मंत्राच्या अनुपालनार्थ आणि हिंदुत्वाच्या रक्षणार्थ या सातही जणांना कोणते तरी प्रायश्चित देऊन, त्यांचे करवी एखादा यज्ञ करवून अथवा ईश्वरनामाचा जप करवून त्यांच्या पापांचे क्षालन झाले असते. परंतु पक्षाच्या घटनेतील शिस्तभंगाच्या मुद्द्याने हिंदुत्वावर मात केली. आणि साक्षात देवेंद्र फडणवीस यांचे साक्षीने या सातही जणांवर भाजपाने सहा वर्षांकरिता बहिष्कार टाकला.
त्यामुळे भाजपाच्या सेफ झोन मधून बहिष्कृत झालेल्या या सप्तर्षींना येणारे सहा वर्षे पक्षाकरिता केलेले श्रम, पक्षावरील निष्ठा आणि पक्षाकरिता केलेला त्याग आठवीत विजनवासात घालवावे लागणार आहेत. त्यामुळे हिंदू एकीकरणार्थ पोट तिडकीने फडणवीसांकडून आळविला जाणारा ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा फोल ठरला आहे.
कोणत्यातरी हिंदूच्याच इशाऱ्यावर या सात हिंदूंना फडणवीस बावनकुळे यांनी वाटून आणि काटून हिंदुद्रोह केला आहे. त्यामुळे ‘हिंदू खत्तरे मे’ आणण्याचे फडणवीस बावनकुळे यांचे हे वर्तन पक्षीय शिस्तभंगापेक्षा हिंदू एकतेला घातक असल्याचे जाणकारांचे मत आहे.
एकीकडे अकोला शहरात कार्यकर्त्यांची अशी हकालपट्टी सुरू असतानाच आकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांचेवर मात्र फडणवीस बावनकुळे यांनी मायेची उबदार पाखर घातली आहे. त्याखाली सेफ होऊन भारसाखळे अगदी निश्चिंत पहूडलेले आहेत. त्यांना प्राप्त झालेल्या फडणवीस बावनकुळे यांचे सुरक्षा कवचाने पक्षीय घटनेतील शिस्तभंग नामक अस्त्राच्या पार ठिकऱ्या उडाल्या आहेत.
वास्तविक अकोल्याच्या निलंबित सप्तर्षींपेक्षा भारसाखळे यांचा अपराध मोठा आहे. त्यांनी भाजपच्या घटनेतील शिस्तच मोडली नाही तर मित्र पक्षाच्या पाठीतही खंजीर खुपसला आहे. अर्थात त्यांच्या या दगाबाजी मध्ये स्वतः फडणवीस बावनकुळे हे सुद्धा सामील आहेत. त्यासोबतच अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष राज्यसभा खासदार अनिल बोंडे, भाजप नेत्री नवनीत राणा यांचाही यात समावेश आहे.
घटना अशी आहे की, प्रकाश भारसाखळे यांना भाजप तर्फे आकोटची उमेदवारी दिली गेली. त्याच वेळी दर्यापूर मतदार संघ शिंदे सेनेकरिता सोडण्यात येऊन तेथे कॅप्टन अभिजीत अडसूळ यांना शिंदे सेनेची उमेदवारी दिली गेली. त्यामुळे स्वपक्ष आणि मित्र पक्षाचेच काम करण्याची जबाबदारी भारसाकळे यांचेवर होती. परंतु त्यांनी स्वपक्ष आणि मित्रपक्ष यांच्याशी द्रोह केला आणि रमेश बुंदिले यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले.
या षडयंत्रात अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनाही सामील करून घेतले. मजेदार म्हणजे भाजपची नेता असल्यावरही भाजपच्या मित्र पक्षाच्याच उमेदवाराविरोधात नवनीत राणा यांनी आपल्या पतीच्या पक्षाची उमेदवारी रमेश बुंदिले यांना दिली. आणि मित्र पक्षाचे काम सोडून डॉक्टर अनिल बोंडे यांनी सुद्धा बुंदिले यांना समर्थन दिले.
या गद्दारी ची माहिती वरपर्यंत गेली. त्यावर फडणवीस आणि बावनकुळे यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांची गय न करण्याच्या गर्जना राणा भीमदेवी थाटात ठोकल्या. डॉक्टर अनिल बोंडे यांनीही या गर्जनेचा पडसाद उमटविला. परंतू भारसाखळे आणि राणा यांनी या गर्जनेला वल्गनेंपेक्षा अधिक महत्त्व दिले नाही.
त्यांनी आपले दगा कार्य जारीच ठेवले. रमेश बुंदिले यांच्या बॅनर्सवर भारसाखळे राणा यांची छायाचित्रे झळकतच राहिली. अर्थात ही बित्तंबातमी फडणवीस बावनकुळे यांचे पर्यंत पोहोचतच होती. परंतु कार्यव्यस्ततेमुळे त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. आणि या दुर्लक्षाचा नेमका लाभ भारसाखळे यांनी उचलला आणि आपल्या पक्षविरोधी कारवायांचा अस्सल पुरावा उपलब्ध करवून दिला.
ऐन मतदानाचे आधले दिवशी भारसाखळे यांनी दोन्ही बाजूंनी कमळ छापलेला दुपट्टा पांघरून अपक्ष उमेदवार बुंदिले यांना मत देण्याचे आवाहन दर्यापूर मतदारसंघातील जनतेला केले. आणि तो व्हिडिओ व्हायरलही केला.
त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. परंतु मतदान, मतमोजणी, सरकारचा शपथविधी आदी सोपस्कार असल्याने हा विषय काना वेगळा झाला. परंतु आता सारे स्थिरस्थावर झाल्यावर पक्षविरोधी कारवायांबाबत प्रकाश भारसाकळे यांचेवर काय कारवाई होते, याची आकोट मतदार संघाला उत्सुकता लागली होती.
परंतु झाले उलटेच. प्रकाश भारसाकळे यांना फडणवीस बावनकुळे यांनी सेफ झोन मध्ये ठेवून अकोला शहरातील भाजपच्या सात पदाधिकाऱ्यांवर पक्ष निलंबनाची कारवाई केली. या कारवाईने आकोट मतदार संघातील भाजप अंतर्गत भारसाखळे विरोधकांना मोठाच हादरा बसला आहे.
याचे महत्त्वाचे कारण दहा वर्षात भारसाखळे यांनी या लोकांची केलेली कुचंबना. आता निवडून आल्यावर पक्षश्रेष्ठी त्यावर इलाज करण्याऐवजी भारसाखळे यांचीच जरब पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांवर लादू इच्छित असल्याचा संदेश जनमानसात गेला आहे.
त्यामुळे भारसाखळे यांचेवर पक्षविरोधी कारवायांबाबत कोणतीच कारवाई होणार नसून पुढील काळ त्यांच्या जाचातच काढावा लागणार असल्याची भाजपा नेते, कार्यकर्त्यांमध्ये धारणा पसरली आहे. त्यामुळे फडणवीस शब्दाचे धनी नसून पक्षपाती असल्याचे आणि मोठ्यांचे पाप झाकून सामान्यांचे मात्र वाकून पाहणारे असल्याचे बोलले जात आहे.