अहेरी – मिलिंद खोंड
जिल्हा पोलिस दलाचे जवान नक्षली चळवळीशी दोन हात करीत असतांना विविध सामाजिक उपक्रम राबवित आले आहे जीमल गट्टा येथील उपविभागीय अधिकारी चक्क महामार्गाच्या दुरुस्तीसाठी रस्त्यावर उतरल्याने कौतुक होत आहे. सोबतच या महामार्गाची कशी दुर्दशा झाली आहे ते दिसते.
आल्लापल्ली सिरोंचा 353 क या राष्ट्रीय महामार्ग हा दुरावस्थेमुळे वाहतूकदारांसाठी मृत्यूचा सापळाच ठरत आलेला आहे. वाहतूकदारांची ही समस्या लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांच्या पुढाकाराने रेपनपल्ली पोलिसांनी पुढाकार घेत लोकसहभागातून या रस्त्याची डागडुजी केली. यासाठी ब्लेड ट्रॅक्टर च्या साहाय्याने मुरूम टाकून मोठमोठे खड्डे बुजवण्यात आले.रेपनपल्ली पोलिसांच्या या पुढाकाराबद्दल ग्रामस्थांसह वाहतूकदारांकडून विशेष कौतूक होत आहे.
अहेरी-सिरोंचा या 353 राष्ट्रीय महामार्गाची दैनावस्था झाली आहे. या मार्गाची अक्षरश: चाळण झाली असून ठिकठिकाणी पडलेले खड्डे सातत्याने अपघातास आमंत्रण देत आले आहेत. त्यामुळे सदर मार्ग मृत्यूचा सापळा म्हणून जिल्हाभरात गणल्या जातो. दरम्यान याच मार्गावर येत असलेल्या रेपनपल्ली मार्गावर पडलेले खड्डे धोकादायक ठरत होते. मात्र संबंधित विभागाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने वाहतूकदारांसह रेपनपल्लीवासीयांना यामुळे त्रस्त झाले होते.
वाहतूकदारांची ही समस्या लक्षात घेता पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अहेरी अप्पर पोलिस अधीक्षक अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी क्षिरसागर यांच्या नेतृत्वात रेपनपल्ली उपपोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पांडूरंग रहाडे, पोलिस उपनिरीक्षक जी. डी. खटिंग यांनी पुढाकार घेत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचेसह लोकसहभागातून खड्ड्यात मुरुम टाकीत रस्त्याची डागडूजी केली.
रेपनपल्ली पोलिस अधिका-यांच्या नेतृत्वात येथील जवानांनी लोकांच्या सहकार्याने मार्गावरील खड्डे बुजवित सदर रस्ता वाहतूकीस अधिक सुकर केला. रेपनल्ली पोलिसांच्या या पुढाकाराबद्दल रेपनपल्लीवासीयांसह वाहतूकदारांनी आनंद व्यक्त केला आहे.
क्षीरसागर यांनी पदभार घेतल्यापासून उपविभागाच्या हद्दीतील ग्रामीण जीवनपद्धती, मागासलेपणा,अशिक्षितपना,शासकीय योजनेपासून वंचित ,रस्ते ,पाणी आदी समस्यांची जाणीव झाली या परिसरात शासकीय योजनांची माहिती देऊन लाभ दिला पाहिजे यावर भर देत पोलीस दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून हद्दीतील अनेक नागरिकांची शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.
मोटार सायकल वाहन परवाना ,रेशन कार्ड,पॅन कार्ड,आधार कार्ड, इ-श्रम कार्ड,आपसातील तंटे मिटवून सलोखा राखणे, रस्ताची दुरुस्ती ,मेळाव्याच्या माध्यमातून जनजागृती, झाडे वाटप अश्या अनेक योजना नागरिकांनापर्यत पोहचविण्याचे मोलाचे कार्य केले आहे.