Sunday, December 22, 2024
Homeराज्यसरपंच पदाचा उमेदवार बनण्यामागील तुमचा उद्देश काय? ओरिसामधील ग्रामस्थांनी विचारलेला प्रश्न महाराष्ट्रीयन...

सरपंच पदाचा उमेदवार बनण्यामागील तुमचा उद्देश काय? ओरिसामधील ग्रामस्थांनी विचारलेला प्रश्न महाराष्ट्रीयन विचारतील काय?

आकोट – संजय आठवले

महाराष्ट्र राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घोषित झाल्याने आणि थेट जनतेतून सरपंच निवडून द्यावयाचा असल्याने या पदासाठी अनेक हथकंड्यांचा वापर करण्याची सिद्धता सुरू झाली आहे. यापूर्वी अशाच निवडणुका दरम्यान ओरिसा राज्यातील ग्रामस्थांनी सरपंच पदाच्या उमेदवारांना त्यांच्या या उमेदवारीसाठीचा उद्देश्य विचारून त्यांची चक्क परीक्षा घेतली होती. आता तोच प्रयोग महाराष्ट्रीयन ग्रामस्थ करतील काय? असा प्रश्न त्यानिमित्ताने पुढे येत आहे.

सद्यस्थितीत संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. परंतु राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींमध्ये मात्र निवडणुकीच्या तापाने वातावरण चांगलेच उष्ण होत चालले आहे. त्यातच सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होत असल्याने वातावरणात वेगळेच रंग भरले जात आहेत. राज्यात नुकतेच सत्तेचे महानाट्यही चांगलेच गाजले आहे. त्याच महानाट्यातील पात्रांचे या निवडणुकीत पुरते समर्थन लाभणार असल्याने तर या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

“खोक्यांचा प्रयोग” शक्य नसला तरी लाल किंवा हिरव्या कागदाची पुंगळी व पावटीचा प्रयोग मात्र हमखास होण्याची चिन्ह दिसत आहेत. मात्र या प्रयोगांनी निवडणुकीचा मुख्य उद्देशच मातीमोल होणार आहे. तो म्हणजे क्षमता प्रधान उमेदवाराची निवड. या उद्देशाचा कधीच विचार केला जात नाही. सर्वदा धनबल आणि बाहुबलाने किंवा पांचट भावनांच्या आहारी गेल्याने सक्षमतेवर अक्षमतेचीच सरशी झालेली दिसते. परंतू त्यामुळे ही “क्षमता प्रधान प्रजाती” राजकारणातून नामशेष होत असल्याचे या धनबली, बाहुबली प्रयोगकारांच्या ध्यानातच येत नाही.

त्यामुळे अनेक ठिकाणी केवळ कुणाच्यातरी हातचे बाहुलेच निवडून येते. अनेक महिलांना घरी बसवून त्यांचे पतीच सरपंचाचा कार्यभार सांभाळतात. तर अनेक ठिकाणी सरपंचाच्या अज्ञानाचा लाभ घेऊन ग्रामसचिवच आपली मनमानी करतात. अशा अराजकाने असंख्य ग्रामपंचायतीतून अहोरात्र लोकशाहीची पायमल्ली सुरू राहते.

असे होऊ नये आणि योग्य क्षमताधारक उमेदवारच निवडला जावा, अशी शक्कल मात्र ओरिसा राज्याच्या सुंदरगड जिल्ह्यातील मालूपाडा गावातील ग्रामस्थांनी लढविली. या गावातून एकूण ८ उमेदवार सरपंच पदाची निवडणूक लढवीत होते. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांना एका मंचावर बोलावून चक्क त्यांची परीक्षा घेतली. त्यासाठी ग्रामस्थांनी या उमेदवारांना अनेक प्रश्न विचारले. सरपंच पदाचा उमेदवार होण्यासाठी तुमचे पाच उद्देश्य सांगा. सरपंच बनल्यानंतर पाच वर्षात तुम्ही करणार असलेल्या कामांची यादी द्या. निवडणुकीत उभे राहण्यापूर्वी तुम्ही केलेली जनसेवेची पाच कामे सांगा.

आता घरोघरी जसे फिरणार आहात तसे निवडणूक जिंकल्यावर फिरणार आहात काय. तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीला कसे बनविण्याचे स्वप्न पाहता? तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किती प्रभाग आहेत? त्या प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या किती आहे? अशा अनेक प्रश्नांची परीक्षा, लेखी व तोंडी दोन्ही स्वरूपात घेण्यात आली. त्यामध्ये ५ उमेदवार अनुत्तीर्ण व ३ उमेदवार उत्तीर्ण ठरले. आणि महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीत या ३ च उमेदवारांना मतदान करण्यात आले.

व्यवहारातील कोणतीही नियुक्ती करताना उमेदवाराची क्षमता चाचणी घेतली जाते. मात्र भारतात राजकीय क्षेत्रात “चलता पुर्जा” असणे महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे राजकारणात “काहीही करा पण जिंका” हे ब्रह्मवाक्य ठरलेले आहे. त्याला छेद देण्याकरिता ओरिसा राज्याच्या सुंदरगड जिल्ह्यातील मालुपाडा येथील ग्रामस्थांचा हा कित्ता महाराष्ट्रातील ग्रामस्थांनी गिरविणे ही काळाची गरज आहे. परंतु ग्रामस्थांना काळाच्या गरजेचं नाही तर स्वतःच्या गरजेचे महत्त्व अधिक असल्याने असा प्रयोग महाराष्ट्रात तरी संभवत नाही.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: