संपूर्ण देशात गाजत असलेल्या बदलापूर प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेच एन्काऊंटर झाल्याने विरोधकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. १२ आणि १३ ऑगस्टला ही घटना घडली. या प्रकरणासाठी तळोजा तुरुंगातून अक्षय शिंदेला ठाण्याला नेत असताना चकमकीत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरुन आता जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप पोस्ट करत मोठा आरोप केला आहे. ही क्लिप कथित प्रत्यक्षदर्शींची असल्याचा आव्हाडांचा दावा आहे.
२३ सप्टेंबरला अक्षय शिंदेला पोलिसांच्या व्हॅनमधून ठाण्याच्या दिशेने आणण्यात येत होतं. त्यावेळी मुंब्रा या ठिकाणी अक्षय शिंदेने पोलिसांच्या हातून बंदुक हिसकावली. त्यानंतर अक्षय शिंदेने गोळीबार केला आणि त्यात दोन पोलीस जखमी झाले. उत्तरादाखल ज्या गोळ्या चालवण्यात आल्या त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. हा एन्काऊंटर सरकारने ठरवून घडवून आणल्याचा आरोप सत्ताधारी ही घटना समोर आल्यापासून करत आहेत. तर अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळ्या झाडल्यानंतर पोलीस त्याला कायदा सांगत बसतील का? असा सवाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या प्रकरणाला पाच दिवस उलटल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्यक्षदर्शींची एक क्लिप पोस्ट केली आहे.
जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केलेल्या क्लिपमधलं संभाषण दोन हिंदी भाषिक व्यक्तींमधलं आहे. हे दोघंही मुंब्रा भागातले रहिवासी आहेत असं संभाषणावरुन लक्षात येतं आहे. अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका. निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती. असं या संभाषणाबाबत आव्हाड म्हणाले आहेत. काय आहे ती क्लिप पाहूया…
अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 28, 2024
निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती. pic.twitter.com/tfnkQ6HmkU