अकोला येथील सुप्रसिद्ध चित्रकार अमृता सेनाड यांनी श्री राजराजेश्वर यांची प्राचीन कथा चित्राच्या माध्यमातून रेखाटली असून श्री राजराजेश्वर कथेला चित्रकलेचे कोंदण लाभल्याने चित्ररूपी श्रीरागराजेश्वर कथा महत्त्वाचा संदेश देत आहे.
शहराचे ग्रामदैवत श्री. राजराजेश्वर महाराज म्हणजेच कैलासपती भगवान भोलेनाथ यांचे स्वयंभू लिंग जागृत असून, घडणावळीवरून ते पंधराशे वर्षांपूर्वीचे असावेत, प्राचीन काळी पूर्वी हे देवालय नदीच्या काठावर अरण्यात असून येथे घनदाट जंगल असल्याने हिंस्र पशुंचा वावर राहत असे. येथून दोन कोस अंतरावर अकोलसिंग नावाचा थोर, दानशूर व प्रेमळ राजा कारभार करीत होता. राजाची राणी प्रभावती दोघेही शिवभक्त असल्याने येथे घनदाट जंगलात भगवान श्री राजराजेश्वराचे दर्शनाला येऊन मनोभावे पूजा अर्चा करीत असत. वैभव संपन्नता व ऐश्वर्या असून सुद्धा संतती नसल्याने ते शल्य उभयतांना होत असे.
एके दिवशी स्वप्नात शिवपार्वती येऊन बारा वर्षे दररोज मध्यरात्री श्री राजराजेश्वर भगवंताची भक्ती भवानी पूजा अर्चा केल्यास पुत्रप्राप्ती होईल. त्यानुसार राजाने आपली राणी प्रभावती हिला हे व्रत आचरण करण्यास सांगितले. राणी दररोज दोन कोस एकटी चालत येऊन श्री राजराजेश्वराची पूजा अर्चना मनोभावे करीत असे. राजाची राणी दररोज रात्रीच्या वेळी अरण्यात जाते हे बघून नागरिकातील लोक विविध वायफळ चर्चा करू लागले. ही वार्ता राजाच्या कानावर पडल्याने राजाचा गैरसमज झाला.
राणी प्रभावतीचे व्रत अखंडपणे चालू असते. शेवटचे केवळ दोन दिवस उरले असताना राणी प्रभावती शिवालयात दर्शनाला गेले असताना संशयाने पीडित होऊन राजा आपल्या हाती तलवार घेऊन राणीच्या मागोमाग पाठलाग करीत मंदिरापर्यंत पोहोचला. राणी प्रभावती तेथे भक्तीभावाने श्री राजराजेश्वराची पूजा करत होती.
तिला तलवार हाती असलेल्या आपल्या राजाचे उग्ररूपाचे प्रतिबिंब दिसले. यावरून तिला सर्व परिस्थिती लक्षात आल्याने हात जोडून महादेवाची मनोमन प्रार्थना केली. भगवंता मी तुझी भक्ती भवानी पूजा केली आहे तसेच मी सती असेल तर मला आपण आपल्या स्थायी स्वरूपात सामावून घ्यावे.
आश्चर्य असे की महादेवाची पिंड दुभंगून राणी प्रभावती त्यामध्ये समर्पित झाली. राजा हे सर्व काही बघत होता. राणीला अडवायला राजा धावला तोपर्यंत राणीच्या वेणीचा थोडासा भाग व जरीचा पदर बाहेर राहिला होता. ती साध्वी राणी प्रभावती असून राजाला म्हणाली मी धन्य झाली आहे मला आता पार्वतीच्या मांडीवर आश्रय मिळाला आहे.
यावेळी राजाला आपल्या वाईट वागण्याचा अत्यंत पश्चाताप झाला. त्यानंतर राजाने श्री राज राजेश्वराच्या सेवेत आपले संपूर्ण आयुष्य घालविले. या ठिकाणी असणाऱ्या नगराचे रूपांतर अकोला नगरीत झाले. राजाच्या नावावरून या नगराचे अकोला हे नाव प्राप्त झाले. ही संपूर्ण आख्यायिका आपल्या सुप्रसिद्ध कलाकार अमृता कुशल सेनाड यांनी साकारली आहेत.