Weather Update : हवामानाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. सकाळ-संध्याकाळ थंडीचा जोर वाढला आहे. त्याचबरोबर धुक्यानेही आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. पर्वतांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तापमानात कमालीची घसरण होताना दिसत आहे. दरम्यान, आजही दक्षिण भारतातील अनेक भागात आणि डोंगराळ राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आजही पश्चिम हिमालयीन भागात बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हिमालयाच्या उंच शिखरांवर गेल्या अनेक दिवसांपासून सतत बर्फवृष्टी आणि पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील अनेक भागात तापमानात सातत्याने घसरण होत आहे. परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी तापमान शून्य ते उणेच्या खाली गेले आहे. अशा परिस्थितीत पारा घसरल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आजही हवामान खात्याने जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या अनेक भागात बर्फवृष्टीसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने उंच पर्वतीय भागात अनेक ठिकाणी हिमवृष्टी आणि पावसाचा इशारा दिला आहे. अशा स्थितीत या ठिकाणी तापमान आणखी खाली जाण्याची दाट शक्यता आहे.
IMD म्हणण्यानुसार, डोंगराळ भागात तापमानात सातत्याने घसरण होत असल्याने येत्या काही दिवसांत उत्तर आणि मध्य भारतात ते दिसून येईल. येत्या तीन ते चार दिवसांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, ओडिशा यासह देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
कोस्टल आंध्र प्रदेश, रायलसीमा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार आणि पुद्दुचेरीसह अनेक भागात आज पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि आजही दक्षिणेकडील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेट वेदरनुसार, तामिळनाडू, केरळ, अंदमान आणि निकोबारमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. यादरम्यान दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरात समुद्रात उंच लाटा उसळतील. वाऱ्याचा वेग सुमारे 40 ते 50 किमी प्रतितास असू शकतो.
दुसरीकडे, उत्तर पश्चिम आणि मध्य भारताच्या काही भागांमध्ये किमान आणि कमाल तापमानात आणखी काही घसरण नोंदवली जाऊ शकते. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक खराब श्रेणीत राहण्याची शक्यता आहे.