Weather Update – हवामान खात्याने देशातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे. आज आणि उद्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्र, चंबळ विभाग आणि मध्य प्रदेशचा पश्चिम भाग आणि राजस्थानच्या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. IMD नुसार, ओडिशा, महाराष्ट्रातील कोकण आणि गोव्यात पुढील दोन ते तीन दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
खाजगी हवामान एजन्सी स्कायमेटच्या मते, पुढील २४ तासांत पूर्व आणि मध्य उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तर कोकण आणि गोवा आणि दक्षिण गुजरातमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, मेघालय, सिक्कीम, उत्तराखंड आणि पूर्व राजस्थानमध्ये हलका ते मध्यम पाऊस किंवा मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याचवेळी हिमाचल प्रदेश, पंजाबचा काही भाग, हरियाणाचा काही भाग, पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरातचा उर्वरित भाग, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईतही रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून येत्या २४ तासांत दिलासा मिळण्याची शक्यता नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. परंतु अंधेरी भुयारी मार्गासारख्या काही सखल भाग वगळता कुठेही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे वृत्त नाही. पाणी साचल्याने अंधेरी भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर पुण्यात शहरातील सखल भागात आणि एफसी रोडच्या ठिकाणी भीषण पाणी साचले आहे. संततधार पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा खाली आला असून वातावरण आल्हाददायक झाले आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सध्या भारतात उत्तर-पूर्व वारे पश्चिम-दक्षिण दिशेने वाहत आहेत. भारताच्या पूर्व दिशेकडून दोन चक्रीवादळे अजूनही सक्रिय आहेत, पूर्वेकडील वारे ढगाळ प्रवाह तयार करतात. आज मध्य उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा जोर असेल.