अमोल साबळे
Weather Update : परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून आता राजस्थानातच असला, तरी मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पावसाने डोके वर काढले आहे. बुधवारी मुंबई शहरासह उपनगरात पावसाने हलकी झलक दाखवली असली, तरी पुढील तीन दिवस राज्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दुसरीकडे परतीच्या पावसाची पुरेशी आगेकूच झालेली नाही. गुरुवारपासून त्याची प्रगती होईल. परतीचा पाऊस ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात दाखल होणार असला, तरी त्याचा सध्याचा वेग पाहता त्याला राज्यात येण्यास विलंब होणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, प. महाराष्ट्र, उ. महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत विजांचा कडकडाटासह पाऊस होईल. शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडेल.
२९ सप्टेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजा व गडगडाटासह विखुरलेल्या भागात मध्यम पावसाची शक्यता आहे. नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, ठाणे जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता जाणवते.
माणिकराव खुळे,
माजी अधिकारी, भारतीय हवामान खाते.