Weather Update : मार्च महिना सुरू होताच जवळपास संपूर्ण भारताचे हवामानही बदलू लागले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानात वाढ होत आहे. होळीपूर्वी राजस्थान आणि पश्चिम आणि मध्य भारताच्या मोठ्या भागात वादळ आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 7 आणि 8 मार्च रोजी देशभरात होळीचा सण साजरा केला जाणार आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) उष्णकटिबंधीय हवामान प्रणालीमुळे शनिवार ते बुधवार या कालावधीत गडगडाटी वादळे आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे.
तर राज्यात काही भागात गारपीठीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिमी चक्रवाताच्या वाढलेल्या प्रभावामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे वारे वाहत आहेत. त्याच्या परिणामामुळे उत्तर महाराष्ट्र, ठाणे, रायगड, पालघर आणि विदर्भात 8 मार्चपर्यंत विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता आहे. तर काही भागात 7 मार्चच्या आसपास गारपीट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विदर्भ, मराठवाड्याला फटका
आजपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 ते 8 मार्चपर्यंत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळं पिकांना फटका बसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि सोमवारी मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना येथेही हलक्या सरींची शक्यता आहे. विदर्भात सर्वत्र पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.
आज नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटांसह हलक्या सरींची तुरळक ठिकाणी शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात 6 मार्च पर्यंत अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. अवकाळी पावसामुळं पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. द्राक्ष काढणीला आल्याने त्यातच पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
IMD नुसार, शनिवार आणि रविवारी पश्चिम हिमालयीन भागात विखुरलेला पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यात म्हटले आहे की, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ४ ते ८ मार्चपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने सांगितले की, दक्षिण हरियाणामध्ये शनिवारी आणि पश्चिम राजस्थानमध्ये रविवारपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ८ मार्चपर्यंत असेच हवामान राहण्याची शक्यता आहे.