Weather Update : राज्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला असून यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. तर येणाऱ्या पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचं संकट कायम राहणार आहे. याबाबत हवामान विभागानं गंभीर इशारा दिला आहे. ३ मे पर्यंत अवकाळी पावसाचं संकट हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाउस झाला आहे. तर पुढील ५ दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस होणार असल्याचे म्हटले आहे. राज्यातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे.
हवामान विभागाचे के.एस. होसाळीकर यांनी आज सकाळी ट्वीट करून माहिती दिली आहे. राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. ३० एप्रिल तसेच १, २ व ३ मे रोजी अवकाळी पाऊस पडणार आहे. गारपिटीसह हा पाऊस राज्यातील अनेक भागांत असणार आहे. त्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. ३० एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पडणार आहे. तर विदर्भात गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच १, २ व ३ मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडणार आहे. विदर्भात १ मे रोजी गारपीट तर २ आणि ३ मे रोजी पाऊस पडणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.