रामटेक – राजु कापसे
सतत बरसणाऱ्या पावसामुळे २७ जुलै रोजी मध्यप्रदेश येथील चौराई धरणाचे ४ गेट काही प्रमाणात उघडण्यात आले. चौराई धरणाचे पाणी तोतलाडोह धरणात येत असल्याने तोतलाडोह धरणाचा जलसाठा ८२ टक्के पूर्ण झाला आहे. त्यामुळे २८ जुलैला सकाळी १०:०० वाजता धरणाचे १४ गेट उघडले असल्याची माहिती तेथील अधिकारी अजय शेलार यांनी दिली आहे.
देवलापार परीसरातील मेधदूत जलाशय (तोतलाडोह) चे चौदा दरवाजे ०.३० सेंटीमिटरने उघडले. सदर धरणाची क्षमता ४९० क्युबीक मिटर आहे. सद्याची पाण्याची लेवल ४८७.७० असून सद्याचे स्टोरेज ८३ टक्के आहे. वर येणाऱ्या चौराई धरणाचे पाणी सोडल्याने येथील लेवल वाढली. सध्या १४ गेट मधुन पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
तोतलाडोह धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यावर पारशिवनी तालुक्यातील पेंच धरणाची पाण्याची पातळी निश्चितच वाढणार आहे. यामुळे पेंच धरणाचे देखील काही गेट खोलण्यात येतील अशी शाश्वती आहे. आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी सावधता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.