सीताफळ महासंघाला प्रयोगशील शेतकरी पुरस्कार – 2023 प्रदान
नागपूर – शरद नागदेवे
प्रत्येक गावात अमृत सरोवर तयार केले पाहिजे. नदी-नाल्यांचे खोलीकरण करून पाणी साठवणे, बंधारे बांधून पाणी अडवले गेले पाहिजे. प्रत्येक नेत्याने त्यांच्या मतदारसंघातील गावामध्ये असे जलसंवर्धनाचे काम केल्यास विदर्भात एकाही शेतक-याची आत्महत्या होणार नाही, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
वसंतराव नाईक फाऊंडेशन व वनराई फाऊंडेशन, नागपूर यांच्यावतीने वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रयोगशील शेतकरी पुरस्कार – 2023 वितरण सोहळ्याचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. एन्रेको हाईट्सच्या कन्व्हेंशन हॉलमध्ये झालेल्या या समारोहात नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्याच्या सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्यामबाबू गट्टाणी यांना 21 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आले.
यावेळी श्यामबाबू गट्टानी व स्नेहलता गट्टानी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते तर वसंतराव नाईक फाऊंडेशनचे अध्यक्ष आ. नीलय नाईक, सचिव प्रगती पाटील, वनराईचे निलेश खांडेकर, माजी मंत्री अनिस अहमद यांची मंचावर उपस्थिती होती.
नितीन गडकरी यांनी श्यामबाबू गट्टानी यांनी सीताफळासारख्या नाशवंत फळाच्या लागवडीच्या क्षेत्रात केलेल्या त्यांचे कौतुक केले. सीताफळाचे उत्तम बियाणे, त्यांच्या नर्सरी, उत्पादकता, प्रकिया, ब्रँडिंग आणि योग्यरित्या ब्रँडिग करण्याची गरज असल्याचे सांगत नितीन गडकरी म्हणाले, श्यामबाबू गट्टानी यांच्या कार्यातून विदर्भातील शेतक-यांना प्रेरणा मिळेल आणि विदर्भातील गावांची स्थिती सुधारेल.
हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक हे सुसंस्कृत नेता, उत्तुंग नेतृत्व, शेतक-यांबद्दल तळमळ असणारे व्यक्ती होते. सुधाकरराव नाईकांनीदेखील जलसंवर्धनाच्या क्षेत्रात मोठे कार्य केल्याचे सांगत नितीन गडकरी म्हणाले, विदर्भातील सिंचन टक्केपर्यंत गेले तरच वसंतराव व सुधाकररावांचे स्वप्न पूर्ण होईल.
आ. नीलय नाईक म्हणाले, शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे असे वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते. ते स्वप्न ख-या अर्थाने नितीन गडकरी पूर्ण करीत आहेत. डॉ. गिरीश गांधी म्हणाले, वसंतराव नाईक, पंजाबराव देशमुख यांचे काम पुढे नेण्याचे काम नितीन गडकरी करीत आहेत. त्यांच्या हस्ते गटृटानी यांच्यासारख्या कार्य करणा-यांचा सत्कार करणे संयुक्तिक आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रगती पाटील यांनी केले. त्यांनी वसंतराव नाईक यांचे व फाऊंडेशनच्या कार्यावर प्रकाश टाकला. निलेश खांडेकर यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला तर सूत्रसंचालन अजय पाटील यांनी केले. आभार छबिराज राणे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रकाश कस्तुरे, संजय मुलमुले, अशोक धाबेकर, प्रा. मुरकुटे,
सदाकत सय्यद, सागर भालेराव, लक्ष्मीकांत कलंत्री, शुभंकर पाटील, आर्किटेक्ट महेश मोका, जयश्री राठोड, नितीन जतकर, श्रीराम काळे, अतुल दुरुगकर, गजानन निमदेव, विष्णू राठोड, शरद नागदेवे, चरणसिंग ठाकूर, किरण कोंबे, अविनाश देशमुख, निलकांत पाटील, अनिरुद्ध पाटील, विवेक म्हस्के, मोतीराम राठोड आदींची उपस्थिती होती.
सीताफळावर संशोधन नाही – श्यामबाबू गट्टानी
कवी ना. धो. महानोर यांनी डोंगरद-यातील सीताफळाला बागेत आणले. त्याच्याकडून प्रेरणा नाशवंत सीताफळ यशवंत करण्याचा ध्यास घेऊन 37 वर्षांपूर्वी बाग उभी केली. पिकवता येते पण विकता येत नाही, अशी स्थिती शेतक-यांची असून सीताफळाला फळाचा दर्जा देऊन त्याला जीवनदान देण्याची गरज आहे. 32 जातींचे संकलन करून सीताफळ प्रक्रियेच्या बाबतीत बीज निष्कर्षन केंद्र विकसीत केले.
प्रक्रिया उद्योगाला महाराष्ट्राच्या विविध भागात सुरू झाले असून विदर्भात 7 तर महाराष्ट्रात 80 प्रकल्प उभे केल्याचे े म्हणाले. सीताफळावर कोणतेही संशोधन किंवा मार्गदर्शक दस्तावेज उपलब्ध नाही याची खंत व्यक्त करताना त्यांनी कृषी विद्याीपठ अकोला येथे 21 हेक्टर जमन घेऊन तेथे रिसर्च आणि डेमॉस्टेशनसाठी प्रस्ताव दिला आहे.
त्याकरिता नितीन गडकरी यांनी मदत करावी, अशी विनंती केली. सीताफळाचे प्लांटेशन केले तर यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे, असे ते म्हणाले.