Viral Video : गल्लीत मोकाट कुत्रे दिसले कि आपली दुचाकी हळू चालवण्याचा प्रयत्न करा. जर गाडी वेगाने पळवणार तर कुत्रेही तेवढ्याच वेगाने तुमचा पाठलाग करतात आणि तुमचा अपघात होऊ शकतो. असाच एक Video सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केल्याने स्कूटी चालवणाऱ्या महिलेचा अपघात झाला.
ही महिला स्कूटी चालवत असताना भटके कुत्रे तिच्या मागे लागले. अशा स्थितीत महिलेचा स्कूटीवरील ताबा सुटला आणि स्कूटी एका कारला धडकली. स्कूटीवर एकूण तीन जण स्वार होते. ज्यामध्ये एक मूलही होते. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी बेरहामपूरमध्ये हा अपघात झाला. भटक्या कुत्र्यांनी महिलेचा पाठलाग केला, त्यामुळे महिलेचे लक्ष गेले आणि तिची स्कूटी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडकली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धडकेमुळे स्कूटीवर बसलेले सर्व जण हवेत उडाले आणि रस्त्यावर पडले. अपघातानंतर कुत्रे तेथून पळून जातात. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बालक आणि दोन्ही महिलांना अनेक जखमा झाल्या आहेत. ओडिशा टीव्हीने या महिलांची ओळख सुप्रिया आणि सस्मिता अशी केली आहे.
ओडिशा टीव्हीशी बोलताना स्कूटी चालवणाऱ्या एका महिलेने सांगितले की, “आम्ही सकाळी सहा वाजता मंदिरात जात होतो, तेव्हा सुमारे सहा ते आठ कुत्रे आमच्या मागे लागले. मी स्कूटरचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला. नाही तर कुत्रे चावले असते.”
स्कूटीवर चालणारी महिला आणि लहान मूल दोघेही हेल्मेटशिवाय होते. अशा स्थितीत अनेक ट्विटर युजर्सनी व्हिडिओवर कमेंट करत असे म्हटले आहे की, तिघेही हेल्मेट नसल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत होण्याचा धोका अधिक आहे. तर काही वापरकर्त्यांनी बेरहामपूर महापालिकेला टॅग करून कारवाईची मागणी केली.