वर्धा : कारंजा तालुक्यातील नारा येथे आश्रम शाळेत बारा वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शिवम सनोज उईके असं बारा वर्षीय मृत विद्यार्थ्यांच नाव असून तो अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट येथील चिखलदरा तालुक्याच्या डोमा येथील रहिवासी आहे.
या घटनेमुळे कारंजा परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी असा नाराजीचा सूर पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील स्व. यादवरावजी केचे नावाची आश्रम शाळा आहे. बुधवार सकाळी साडे नऊ वाजता विद्यार्थी दिसला होता मात्र त्यानंतर रात्री साडे आठ वाजता शाळेतील विद्यार्थ्याकडून झोपण्याकरिता गादी काढतांना गादीखाली मृतदेह आढळून आला. दररोज सकाळी विद्यार्थ्यांकडून गाद्याची थप्पी लावली जाते, नेहमीप्रमाणे रात्री झोपण्यासाठी गादी परत काढत असतांना गादीखाली मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कारंजा घाडगे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रवाना केले आहे.