अमरावती जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा…
अमरावती – दुर्वास रोकडे
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी केली जात आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जिल्हा प्रशासन आणि विविध राजकीय पक्षांनी मतदार साक्षरता व मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी योग्य समन्वय साधून अनुषंगीक कामे गतीने पूर्ण करावे, असे आवाहन अमरावती विभाग मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात डॉ. पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज झाली. छायाचित्रासहित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 (अहर्ता दिनांक 1 जुलै 2024 वर आधारित) च्या अनुषंगाने आयोजित प्रथम भेट अंतर्गत या बैठकीत आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपायुक्त (महसूल) गजेंद्र बावणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, सर्व विधासनभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदार नोंदणीबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण मतदाराची संख्या, केंद्रनिहाय सुरु असलेली मतदार नोंदणीची सद्यस्थिती, जिल्ह्यात नव्याने तयार झालेले मतदार केंद्र, प्रस्तावित विलीन होणारी मतदान केंद्र तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेल्या जानेवारी ते जुलै 2024 दरम्यान बैठका आदींबाबत त्यांनी माहिती दिली.
डॉ. पाण्डेय यांनी मतदार नोंदणीच्या कामामध्ये राजकीय पक्षांना येत असलेल्या अडचणीं जाणून घेतल्या व त्या दूर करण्यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला आदेश दिले. राजकीय पक्षांनी मतदार नोंदणी सहाय्यकाची नेमणूक करणे व प्रशासनाच्या समन्वयाने मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचे त्यांनी सांगितले.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ज्या मतदार संघांमध्ये कमी मतदान झाले आहे. तिथे मतदार नोंदणी व मतदान जनजागृती व्यापक प्रमाणात करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी दिले. अशा क्षेत्रात ‘स्वीप’ मोहिम प्रभावीपणे राबविण्यात यावी. युवा मतदारांची मतदार म्हणून अधिकाधिक नोंदणी करावी. यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या ठिकाणी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात यावे, असेही विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, कोणताही पात्र मतदार मतदान यादीत नाव नोंदवावयाचा शिल्लक राहू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले. भारत निवडणूक आयोगाकडून छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या सुधारित कार्यक्रमानुसार 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सुधारित कार्यक्रमानुसार 6 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती मागविण्यात आल्या आहेत. यानुसार पात्र नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती, वगळणी यासाठी विहीत नमुन्यात अर्ज करता येणार आहे. प्राप्त दावे व हरकतींचे 29 ऑगस्ट 2024 पर्यंत निराकरण करण्यात येणार आहे.