मानवी साखळीतुन साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा
लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर उत्साहपूर्ण वातावरणात सोहळा
अकोला – संतोषकुमार गवई
मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदानाबाबत जागृती करण्यासाठी व अकोला मतदारसंघात ७५ टक्क्यांवर मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ‘स्वीप’अंतर्गत दोन हजार शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मतदार प्रतिज्ञा घेतली. लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात मानवी साखळीतून अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारण्यात आला.
जिल्हाधिकारी अजित कुंभार, ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी,आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप निपाणे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
‘स्वीप’अंतर्गत नागरी भागाबरोबरच गावपातळीपर्यंत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत आहेत. मतदानाचे ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण संघटित प्रयत्न करू व लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान देऊया, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी यावेळी केले.
विविध अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्यासह नागरिकही उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अधिकाधिक मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार यावेळो उपस्थितांनी केला. मानवी साखळीबरोबरच ‘मैं भारत हूँ’या गीताचे प्रसारणही यावेळी करण्यात आले. समन्वय अधिकारी गजानन महल्ले, आर. जे. पल्लवी , आर. जे. दिव्या यांनी सूत्रसंचालन केले.