आकोट- संजय आठवले
केंद्र सरकारचे मंत्री, राज्याचे राज्यपाल ते सडक छाप समाजकंटकांद्वारे संपूर्ण देशात महापुरुषांबाबत अमानकारक वक्तव्यांच्या शृंखलेत आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणार्या गीताचीही भर पडली आहे. या गीताचा तीव्र निषेध करीत संतप्त झालेल्या आकोट वंचित आघाडीने या गीताचे जनकावर कठोर कारवाई करण्याची मागणी आकोट पोलिसांकडे केली आहे.
सद्यस्थितीत देशाच्या केंद्र सरकार मधील मंत्री, उच्च पदाधिकारी, राज्यांचे राज्यपाल व अन्य समाजकंटकांद्वारे बहुजन समाजाचे आदर्श छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे बाबा, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबाबत अमानकारक वक्तव्य करणे सुरू आहे. त्यामुळे एका विशिष्ट समुदायाच्या सडक छाप अनुयायांनाही मोठे उत्तेजन मिळत आहे. त्याचाच दुष्परिणाम म्हणून काल-परवाच एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे संदर्भात अश्लील शिवीगाळ आणि घाणेरडे संबोधन असणारे एक गीत युट्युब वर प्रकाशित केले आहे. त्यामुळे महापुरुषांच्या अवमानाने आधीच चिडलेल्या छत्रपती शिवराय. महात्मा फुले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांच्या अनुयायांच्या क्रोधात भर पडली आहे. त्या
मुळे संतापलेल्या आकोट वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आकोट पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये सदर समाजकंटकाला त्वरित अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोबतच बहुजन महापुरुषांचा अपमान भविष्यात होणार नाही याची खबरदारी घेणेबाबत निषेधकर्त्यांच्या जनभावना शासनास अवगत करवून देण्याचीही विनंती करण्यात आली आहे. वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष चरण इंगळे यांचे नेतृत्वात सुभाष तेलगोटे. सै.शरीफ राणा, सदानंद तेलगोटे, शहराध्यक्ष रामकृष्ण मिसाळ, मुरली तेलगोटे, लखन इंगळे, विशाल आग्रे, अक्षय तेलगोटे, विशाल तेलगोटे, सौ. मंदाताई कोल्हे, सौ. सुनीताताई वानखडे, सौ.लताताई कांबळे, सौ चित्राताई तेलगोटे, कल्पना तेलगोटे, अर्चना वानखडे, सुनील वाकोडे, सुनील घनबहादूर, सतीश घनबहादूर, नागेश तेलगोटे, पवन सपकाळ, राजू तेलगोटे, सुगत वानखडे, विनायक भरक्षे, मुश्ताक खान यांनी हे निवेदन दिले.