सांगली – ज्योती मोरे
जुनी पेन्शन पुन्हा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने करून जुन्या पेन्शनची मागणी करत आहेत.
सदर आंदोलनात सांगली जिल्ह्यातील हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना,माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष हाजीसाहेब मुजावर हे म्हणाले की, गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदारांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊन तो निर्णय लगेच अंमलात आणला गेला,यासाठी महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर तीस कोटी रुपयांचा बोजा पडला.
असतानाही शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी मात्र शासनाच्या तिजोरीवर ताण पडेल असा आव आणला जात असून या मागणीबाबत शासन वेळ काढू पणा करत आहे. गेल्या सतरा वर्षांपासून या मागणीसाठी लढा चालू आहे. या मागण्या सरकार मान्य करत नाही. परंतु आमदार, खासदारांच्या पेन्शन मात्र ताबडतोब मान्य केल्या जातात. हे अन्यायकारक असल्याने हा बेमुदत संप करत आहोत.