गुजरातमधील वडोदरा येथे दिवाळीच्या रात्री उशिरा दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ झाली. एवढेच नाही तर पोलिसांसमोरच हल्लेखोरांनी पेट्रोल बॉम्बही फेकले. ही घटना पाणीगेट येथील मुस्लिम मेडिकल सेंटरजवळची आहे.
हल्लेखोरांनी पथदिव्यांवर दगडफेक करून गोंधळ घातला. घटनेची माहिती देताना डीसीपी यशपाल जगनिया यांनी सांगितले की, पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून कारवाई सुरू आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. डीसीपी म्हणाले की सीसीटीव्ही तपासले जात आहेत आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे.
पेट्रोल बॉम्ब हल्ल्यात एक अधिकारी थोडक्यात बचावला
वडोदराचे डीसीपी म्हणाले की, दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. शहरात गोंधळ घालण्याची परवानगी कोणालाही देता येणार नाही. त्याचवेळी पेट्रोल बॉम्ब हल्ल्यातील एक अधिकारी थोडक्यात बचावला. या घटनेची अनेक चित्रेही समोर आली आहेत. या फोटोंमध्ये पोलीस अधिकाऱ्यासमोर पेट्रोल बॉम्ब फेकले गेले आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलिसांसमोर मोठे आव्हान
विधानसभा निवडणुकीपूर्वी वडोदरासारख्या शहरात असा हिंसाचार पोलिसांसाठी आव्हान मानला जात आहे. मात्र, डीसीपींनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले. दंगखोरांना पकडण्यासाठी अनेक ठिकाणी छापेही टाकले जात आहेत.