Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayछत्रपती संभाजीनगर आणि जळगावमध्ये दोन गटांमध्ये हिंसाचार…

छत्रपती संभाजीनगर आणि जळगावमध्ये दोन गटांमध्ये हिंसाचार…

रामनवमीच्या आधीच राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उसळला. छत्रपती संभाजीनगर परिसरात रामनवमीपूर्वी दोन पक्षांमध्ये हाणामारी झाली आहे. दरम्यान, जळगावात मशिदीत नमाज पढताना गाणे वाजवण्यावरून दोन गट एकमेकांना भिडले. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी सतर्कता बाळगत मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला आहे.

छत्रपती संभाजी नगरमध्ये दोन्ही बाजूंच्या हाणामारीत अनेक वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली. संतप्त जमावाने पोलिसांचे वाहनही जाळले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावाचे वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात बुधवारी रात्री हाणामारीची घटना घडली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि सौम्य बळाचा वापर केला. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जळगावात काय परिस्थिती आहे?
दुसरीकडे, जळगावातील एका मशिदीबाहेर नमाजाच्या वेळी मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 जणांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारात चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली आहे.

हिंसाचाराचे कारण काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी रात्री उशिरा मंदिराबाहेर दोन तरुणांमध्ये भांडण झाले. यानंतर दोन्ही तरुणांनी आपापल्या साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर या वादाचे रूपांतर जातीय हिंसाचारात झाले. प्रथम दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. यानंतर गाड्यांची जाळपोळ सुरू झाली. हिंसाचाराची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले पोलिस वाहनही जाळण्यात आले.

एका बाजूने गोळीबारही केल्याचे वृत्त आहे. या हिंसाचारात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण स्थिती आहे. परिस्थिती पाहता किराडपुरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितले की, हिंसाचाराच्या वेळी दगडफेक करण्यात आली आणि पोलिसांचे वाहन पेटवण्यात आले. यासोबतच इतर अनेक वाहनेही जाळण्यात आली. पोलिसांनी लोकांना पांगवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.

संभाजी नगर घटनेवर माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ‘ हे का घडलं, घडवणारे कोण यामागे जाण्याची आवश्यकता आहे. मागच्या महिनाभरापासून आम्ही आवाहन करत आहोत. शहराचं वातावरण अशांत करून जनतेच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न चालू आहे. याला जबाबदार कोण आहे… मुस्लिमांच्या बाजूने एमआयएमसारखी संघटना १०-१० दिवस आंदोलन करते. पोलिस अधिकाऱ्यांवर हात उचलण्याची हिंमत होते, हे हात तोडले पाहिजेत. जे संरक्षण करतात, ते हात तोडलेच पाहिजेत.या घटनेमागे एमआयएम आणि भाजप आहे. त्यांना शहरात दंगल पाहिजे. त्यांचा जनाधार कमी होतोय. म्हणून मुस्लिम समाजाला उचकवणं, सुजाण जनता निमूटपणे बघतेय. मात्र या लोकांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: