नरखेड – अतुल दंढारे
नरखेड-काटोल तालुक्यातील अर्धी गावे डार्क झोन मध्ये असल्यामुळे शासनाच्या सिंचन विहीर करिता असलेल्या विविध योजनापासून शेतकरी वंचित झाला आहे. मागील तीन चार वर्षात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सिंचन विभागाकडून मोठ्या प्रमाणात भूजल स्तर वाढविण्याकरिता अनेक योजना राबविल्या आहे. याचा परिणाम भूजल स्तर वाढण्यास नक्कीच झाला. त्यामुळे डार्क झोन मधील गावाचे भूजल पुन:सर्वेक्षण करावे अशी मागणी पुढे येत आहे.
नरखेड तालुक्यातील १५६ गावांपैकी २३ गावे व काटोल तालुक्यातील १८८ गावांपैकी १२२ अशी ३४४ गावांपैकी १४५ गावे जलस्तर खालावल्यामुळे डार्क झोन मध्ये आली आहेत. डार्क झोन मध्ये असल्यामुळे शासनाच्या मनरेगा अंतर्गत असलेल्या सिंचन विहिर , कृषी विभागाची डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी योजना, बिरसा मुंडा सिंचन योजना, धडक सिंचन योजना व अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरी दुरुस्ती योजना यापासून या १४५ गावातील शेतकरी वंचित आहे.
गेली काही वर्षांपासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे.२०२२-२२ मध्ये सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला. त्यामुळे या गावातील विहिरी , तलाव तुडुंब भरले आहेत. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाअंतर्गत नरखेड- काटोल तालुक्यात अटल भूजल योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.
या सर्वाचा परिणाम भूजल स्तर वाढण्यास झाला आहे. भूजल पुन:सर्वेक्षण झाले तर कित्येक गावे डार्क झोन मधून बाहेर येतील. त्या गावातील शेतकर्याना विहीर करिता असंलेल्या अनेक योजनांचा फायदा होईल. याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी आग्रही आहेत.
शासनाच्या योजना व अनुदान
मनरेगा अंतर्गत एक एकरपेक्षा जास्त शेती असलेल्या शेतकऱ्याला विहीर , कृषी विभाग विभागाकडून अनुसूचित जाती करिता डॉ . बाबासाहेब स्वावलंबन योजना , अनुसूचित जमाती करिता बिरसा मुंडा व पाच एकर पेक्षा जास्त शेती असलेल्या शेतकऱ्याकरिता धडक सिंचन योजना राबविण्यात येते. या प्रत्येक योजनेत ४ लक्ष रुपये अनुदान आहे. याशिवाय अतिवृष्टी मुळे खचलेल्या विहीर दुरुस्ती करिता १लक्ष ५० हजार रुपये अनुदान मिळते.
काटोल तालुक्यातील १८८ गावांपैकी १२२ गावे डार्क झोन मध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन विहिरीचा किंवा दुरुस्तीचा लाभ देता येत नाही. शेतकरी विहीर योजनांचा लाभ घेन्यापासुन वंचीत राहु नये म्हणून सदर गावांचे पुन:सर्वेक्षण करून काटोल तालुक्यातील गावे हे डार्क झोन मधुन कमी करण्यात यावे . असा पंचायत समितीने ठराव करून जिल्हा परिषद व भूजल सर्वेक्षण विभागाला दिला व सर्वेक्षणाची मागणी केली आहे.
संजय डांगोरे
सभापती , पंचायत समिती काटोल
नरखेड तालुक्यातील २३ गावे डार्क झोन मध्ये आहेत. त्यामुळे तेथील शेतकरी विहीर योजनेपासून वंचित आहेत. पुन:सर्वेक्षण झाले तर ही संख्या नक्कीच कमी होईल व त्याचा फायदा शेतकर्याना होईल. पाच एकर पेक्षा जास्त शेती असलेल्या शेतकर्याकरिता असलेली धडक सिंचन योजनेचे गेली दोन वर्षांपासून उद्दिष्ट्य मिळाले नाही त्यामुळे ही योजना कार्यान्वयीत नाही.
नीलिमा सतीश रेवतकर
माजी सभापती , पंचायत समिती नरखेड