गोकुळ शिरगाव – राजेद्र ढाले
गांधीनगर मध्ये गेल्या १० वर्षा पासुन मोकाट कुत्री व गाढवांचा बंदोबस्त न करणाऱ्या व ग्रामस्थांच्या जिवाशी खेळणाऱ्या तसेच बेकायदा, विनापरवाना, शासनाचे विहित नियम धाब्यावर बसवून बांधकाम करणाऱ्यांना अभय देणाऱ्या गांधीनगर ग्रामपंचायतीवर कारवाई करा :अन्यथा आपल्या कार्यालयात कुत्री व गाढवे सोडून आंदोलन करण्यात येईल.
ग्रामसेवक ऐवजी ग्रामविकास अधिकारी कायमस्वरूपी तात्काळ उपलब्ध करा. मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी गांधीनगरमध्ये धुडगुस घातल्याने २५ वर जण जखमी झाले. ग्रामपंचायतकडे तक्रारी देऊनही सरपंच, ग्रामसेवक व प्रशासनाने कारवाई केलेली नाही. त्यामुळे जीव घेणे हे संकट आजही कायम आहे.
पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत यापुर्वीच तक्रार दिली आहे. तरीसुध्दा कारवाई झालेली नाही. ग्रामसेवकावर सेवेत कुचराई केल्याबद्दल कारवाई व्हावी. गेल्या काही दिवसात पंचवीसवर जणांचा चावा पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला. तसेच राज्य शासनाचे बांधकामचे विहित नियम व अटींचा भंग करून गांधीनगरमध्ये अतिक्रमणाचे जंगल उभा राहिले असून ग्रामपंचायत जाणीवपूर्वक त्याकडे डोळेझाक करत आहे. हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.
सरपंच ट्रेनिंगला गेलेत, ग्रामसेवकाकडे दुसऱ्या गावाचाही कारभार आहे त्यामुळे ते उपस्थित नाहीत, अशा अवस्थेत ग्रामस्थांनी न्याय कुणाकडे मागायचा? ग्रामसेवक ऐवजी ग्राम विकास अधिकारी दर्जाचा अधिकारी नेमण्यात यावा. त्या दर्जाचा अधिकारी नसल्याने बेकायदेशीर बांधकामासारख्या अनेक समस्या उभ्या राहत आहेत. प्रशासक विजय वसंत यादव यांनी ग्रामपंचायतला नोटीस देण्यात येईल, असे यादव सांगितले होते.
पण ठोस कारवाई न झाल्याने भटकी कुत्री, गाढवे यांचा ग्रामस्थांना धोका कायम आहे. बेकायदा बांधकामे, अतिक्रमणावर कारवाईच होत नाही, हे येथील जनतेचे दुखणे आहे. याबाबत गांभीयनि विचार व्हावा व बेकायदा अतिक्रमणावर कारवाई व्हावी, पूर्णवेळ कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकारी दर्जाचा ग्रामसेवक तत्काळ नेमण्यात यावा अन्यथा आपल्या कार्यालयात कुत्री आणि गाढवे आणून शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.
करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी याअगोदरही या संदर्भात निवेदन दिले होते मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने मा. संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर, यांना देण्यात आले.
यावेळी अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाने केलेल्या मागण्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करू असे आश्वासन दिले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, विभागप्रमुख दिपक पोपटानी, शाखाप्रमुख दिपक अंकल, उपतालुकप्रमुख राहुल गिरुले, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार,
ग्राहकसेना तालुकाप्रमुख जितेंद्र कुबडे, विभागप्रमुख वीरेंद्र भोपळे, किशोर कामरा, सुनील पारपाणी, संजय काळूगडे, अजित चव्हाण, जितू चावला, शरद चव्हाण, युवासेनेचे सुनील चौगुले आदी शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.