सोशल मीडिया स्टार बॉबी कटारियाचा एक व्हिडिओ गुरुवारी व्हायरल झाला, ज्यामध्ये तो विमानात बसून धूम्रपान करताना दिसत आहे. जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा लोकांनी थेट विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि अमित शहा यांना टॅग केले आणि कारवाईची मागणी केली. यावर सिंधिया यांनी एका यूजरच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, अशा चुकीच्या कृती अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्याचवेळी हा व्हिडिओ जुना असून बलविंदर कटारिया उर्फ बॉबी कटारियावर कडक कारवाई करण्यात आली होती, असे विमान वाहतूक महासंचालनालयाकडून सांगण्यात आले.
एएनआयच्या रिपोर्टनुसार, बलविंदर कटारिया 23 जानेवारी 2022 रोजी दुबईहून मुंबईला गेला होता. तेव्हाचा हा व्हिडिओ आहे, जो बलविंदर कटारियाने त्याच्या सोशल मीडिया पेजवरून हटवला आहे. “हा व्हिडिओ आता बलविंदरच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर उपलब्ध नाही,” असे प्राधिकरणाने सांगितले. त्याच्यावर यापूर्वीच कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, स्पाईसजेट या विमान कंपनीचे वक्तव्यही समोर आले आहे, ज्याच्या फ्लाइटमध्ये बलविंदरने बसून स्मोकिंग केले होते. स्पाइसजेटने सांगितले की, “जानेवारी 2022 मध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. या प्रकरणी गुरुग्राममधील उद्योग विहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 20 जानेवारी 2022 चा आहे, जेव्हा बलविंदरने फ्लाइट SG 706 मधून प्रवास केला होता.
24 जानेवारी 2022 रोजी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही बाब त्यांच्या निदर्शनास आल्याचे स्पाइसजेटने म्हटले आहे. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि बलविंदरला विमान कंपनीने १५ दिवसांसाठी नो फ्लाय लिस्टमध्ये टाकले. बॉबी कटारिया अनेकदा कायदा मोडणारे कृत्य करत आहे. 28 जुलै रोजीही त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो रस्त्यावर मद्यपान करताना दिसत आहे. वृत्तानुसार, याप्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी त्याच्यावर कारवाईही केली होती. मूळचा हरियाणाचा असलेला बॉबी कटारिया याने या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘सड़कें अपने बाप की’
बॉबी कटारिया टिकटॉकवरही प्रसिद्ध आहे
बॉबी कटारिया हा एक सोशल मीडिया स्टार आहे, जो पेशाने बॉडीबिल्डर आहे. इंस्टाग्रामवर बॉबीचे ६ लाख ३० हजार फॉलोअर्स आहेत. टिकटॉकवरही तो खूप प्रसिद्ध आहे. मात्र त्याच्यावर बंदी घातल्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली.