मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात दिल्लीतील केजरीवाल सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिहार तुरुंगात बंद असलेले सत्येंद्र जैन हे तुरुंगात सुखाचे जीवन जगत असल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सत्येंद्र जैन जेलमध्ये आपल्या बॅरेकमध्ये मसाजचा आनंद घेताना दिसत आहेत.
हे फुटेज समोर आल्यानंतर आम आदमी पक्ष भारतीय जनता पक्षाच्या निशाण्यावर आला आहे. हे फुटेज समोर आल्यानंतर भाजपने सत्येंद्र जैन यांना तुरुंगात व्हीआयपी वागणूक मिळत असल्याचा आरोप केला.
शनिवारी तिहार तुरुंगातील सत्येंद्र जैन यांच्या बॅरेकमधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. व्हायरल फुटेजमध्ये सत्येंद्र जैन त्यांच्या सेलमध्ये मसाज करताना दिसत आहेत.
तुरुंगाच्या कोठडीत एक अज्ञात व्यक्ती मंत्री सत्येंद्र जैन यांच्या पायाला आणि शरीराला मालिश करताना दिसत आहे. याबाबत ईडीने या संपूर्ण प्रकरणाची कोर्टात तक्रार केली असून कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज कोर्टाकडे सुपूर्द केले आहेत.
सत्येंद्र जैन तिहारच्या सात क्रमांकाच्या तुरुंगात बंद आहेत. सत्येंद्र जैन यांना सुविधा दिल्याप्रकरणी तुरुंग अधीक्षकांसह चार तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर 35 हून अधिक तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तुरुंग बदलण्यात आले आहेत.