अजय पाटील यांची विदर्भ केंद्राध्यक्षपदी निवड…
नागपूर – शरद नागदेवे
बांबू सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र चॅप्टर , विदर्भ केंद्राची बैठक नुकतीच महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, वोक्हार्ट हॉस्पिटलच्या मागे, शंकर नगर येथे पार पडली. यात विदर्भ केंद्राच्या पहिल्या नियामक मंडळाची कार्यकारिणी निवड करून जाहीर करण्यात आली असून विदर्भ केंद्राध्यक्षपदी अजय पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
अजय पाटील हे वनराई फाउंडेशनचे विश्वस्त असून महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदो. वनपाल संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ कर्मचारी व अधिकारी संघटनेचे अध्यक्ष, एशियाटीक बिग कॅट सोसायटीचे अध्यक्ष तसेच, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभाचे विदर्भ विभागाचे अध्यक्ष आहेत.
वन आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. या बैठकीत आर्किटेक्ट आशिष नागपूरकर यांची कार्यकारी संचालकपदी, इंजिनीयर आशिष कासवा यांची सचिव व कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर डॉ. विजय इलोरकर, डॉ. विजय घुगे, रमेश डुंभरे, अॅड. राजीव देशपांडे हे सदस्य राहतील.
बांबू सोसायटी ऑफ इंडिया विदर्भ चॅप्टरच्या सदस्यांनी विदर्भात बांबू नर्सरीपासून ते उद्योगापर्यंतच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा तसेच, कृषी-वनीकरण-तांत्रिक विकासासाठी सर्व प्रकारचे सहाय्य प्रदान करण्याचा यावेळी संकल्प केला. बांबू सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र चॅप्टरचे संस्थापक आर्किटेक्ट सुनील जोशी हे या बैठकीचे संयोजक होते. त्यांनी सभेला संबोधित करताना विदर्भ चॅप्टरच्या स्थापनेची गरज प्रतिपादित केली. हे केंद्र विदर्भात बांबू क्षेत्राच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी मदत करेल, असे ते म्हणाले.
अजय पाटील यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताना बांबू क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे सांगितले. तसेच, महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र बांबू विकास मंडळासोबत विविध उपक्रम राबविण्यात येतील व शेतकरी व या क्षेत्राशी संबंधितांच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील. बांबू लागवडी संदर्भात शेतक-यांना सातत्याने मार्गदर्शन करण्यात येईल, असे सांगितले. त्यांनी या नियुक्तीसाठी सर्वांचे आभार मानले.
उपस्थित सदस्यांमध्ये दीपक सुने, आर. एस. डवलकर, रवी नाफडे, आर्किटेक्ट महेश मोखा, आर्किटेक्ट अनंत खारपटे, प्रा. उदय गडकरी, आर्किटेक्ट गणेश हरीमकर, प्रताप गोस्वामी, सुरिंदर पाल सिंग, विराज जोशी, डॉ. देबारती दत्ता, इंजिनीयर सादिक अमीन, राजेंद्र जगताप, इरफान अहमद, उमेश निनावे, आर्किटेक्ट प्राची झाडे यांचा समावेश होता.
नवनियुक्त अध्यक्षांनी उपस्थितांचे आभार मानले .