चंद्रपूर (नरेंद्र सोनारकर)
लोकसभेच्या निवडणुकीत ना.सुधीर मुनगंटीवार यांचा 2 लाख 60 हजार मतांनी दारुण पराभव करत प्रतिभा धानोरकर यांनी खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश केला.इंडिया आघाडी ने विशेषतः काँग्रेस ने चंद्रपूर लोकसभेच्या सहाही विधानसभेत मारलेली मुसंडी काँग्रेसच्या नेते,कार्यकर्त्यात नवचैन्याची लाट निर्माण करून गेली.त्यामुळे बल्लारपूर,चंद्रपूर विधानसभेत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी मोठी गर्दी झाली आहे.इंडिया आघाडीत आतापर्यंत कुठला बिघाड दिसून येत नसला तरी,बल्लारपूर विधानसभेत शिवसेना (उबाठा) च्या वतीने संदीप गिरे यांनी दावेदारी पेश केली आहे.तर घनशाम मुलचंदांनी यांनी 2014 च्या निवडणुकीत ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या विरुद्ध पंजा हे निवडणूक चिन्ह घेऊन 60 हजारावर मते घेतली होती. काँग्रेस पक्षाचे निष्ठावान तथा जुने जाणते नेते म्हणून परिचित, माजी नगराध्यक्ष घनशाम मुलचंदानी यांनीही उमेदवारी मिळण्यासाठी पक्षाकडे दावेदारी केली आहे.
तर समाजिक क्षेत्रात अविरत कार्य करून बल्लारपूर विधानसभेत भूमिपुत्र ब्रिगेट च्या माध्यमातून संघटन उभारून जनांदोलनात तत्पर अशा डॉ.अभिलाषा गावातूरे यांनीही पक्षाकडे दावेदारी केली आहे.दरम्यान राहुल गांधी,प्रियांका गांधी यांच्या निकटवर्तीया पैकी एक मानल्या जाणारे रोशनलाल बिट्टू,जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिनेश चोखरे,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनीही काँग्रेसकडे दावेदारी केलेली आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे बेबीताई उईके,राजेंद्र वैद्य यांनीही विधानसभेत मुनगंटीवार यांच्या विरुद्ध लढण्यास आपल्या पक्षाकडे उमेवारी मागितली आहे.
इंडिया आघाडी तर्फे बल्लारपूर विधानसभेत कुणाला उमेदवारी मिळेल?हे सद्यातरी सांगणे कठीण असले तरी,राज्याचे वने, मत्सव्यवसाय,सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेच्या पराभवातून मोठा धडा घेत ‘डॅमेज कंट्रोल’ च्या माध्यमातून जोमात कामाला लागले आहे.त्यांच्या बैठका,मेळावे,सामाजिक उपक्रम जोमात सुरु आहेत.त्यांनी बल्लारपूर विधानसभेत अनेक लोकोपयोगी विकास कार्य केले असले तरी त्यांचे कार्य जणसामान्य जनतेत प्रामाणिक पणे पोहचल्यास मुनगंटीवार यांच्या सहाव्यांदाची विजयी घोडदौड कुणीच रोखू शकणार नाही…दरम्यान काँग्रेस पक्ष कुणाला उमेदवारी देतो,यावर निवडणुकीचे पुढले संदर्भ निश्चित होणार असून,महाराष्ट्र नवनिर्माण सेना,वंचित बहुजन आघाडी,बहुजन समाज पार्टी यांची भूमिका काय असेल?हे अद्याप स्पष्ट नसले तरी,निवडणूक काळात कोणाचे कोणाशी विशेष ‘अर्थपूर्ण’ साठेलाटे होतात,यावर या निवडणुकीत आमने-सामने लढणाऱ्या उमेदवारांच्या विजयाचे गुपित ठरणार आहे.
सद्यातरी मुनगंटीवार यांच्या पुढे काँग्रेसच्या कोणत्या उमेदवाराचे आव्हान असेल,हे निश्चित सांगता येत नसले तरी उमेदवारीच्या दावेदारीत घनशाम मुलचंदानी आणी डॉ. अभिलाषा गावतूरे यांची नावे चर्चेत आहेत हे विशेष..!