Saturday, December 21, 2024
Homeराज्यनिवडणूकीच्या अनुषंगाने विविध आदेश जारी...

निवडणूकीच्या अनुषंगाने विविध आदेश जारी…

अकोला – संतोषकुमार गवई

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पाचहून अधिक व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. जिल्हा दंडाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केले आहे.

उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात, तसेच दालनात केवळ पाचहून अधिक व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही.

तसेच वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा अधिक वाहने असू नयेत. कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्ये वाजविणे, गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

वाहतुकीला अडथळा नको

निवडणूकीचे पोस्टर्स, बॅनर्स, कटआऊटस्, होर्डिंग्ज आदी साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा किंवा अपघात होईल असे लावण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रके लावणे, घोषणा लिहिणे यासाठी कोणतीही खासगी जागा, इमारत, आवार, भिंतीचा वापर करण्याबाबत संबंधित जागामालक व संबंधित परवाना प्राधिकरणाची मान्यता घेणे बंधनकारक आहे.

ध्वनीक्षेपक वापराबाबत मर्यादा

ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिका-यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी 6 वा. वाजण्यापूर्वी व रात्री 10 वा. नंतर वाहनावर किंवा कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपक वापरता येणार नाही. प्रचार वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबून करावा. ध्वनीक्षेपकाच्या आवाजासह वाहन फिरते ठेवण्यास प्रतिबंध आहे.
फिरत्या प्रचार वाहनाबाबत सूचना

फिरत्या वाहनावर पक्ष प्रचाराचा झेंडा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रीन ग्लासपुढे राहणार नाही व वाहनाच्या टपापासून २ फूटाहून उंच असू नये. प्रचार वाहनावर कापडी फलक वाहनचालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावावा. इतरत्र लावू नये. वाहनावर पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर वाहनावर लावू नये. तसे आदेश जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: