मिस कॉल, एसएमएस, टोल फ्री क्रमांक व मोबाईल ॲपची सुविधा
अमरावती – वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी ग्राहकांना महावितरणने टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप, मिस कॉल व एसएमएसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार याच पर्यायांद्वारे करावी, असे आवाहन महावितरणद्वारे करण्यात आले आहे.
मिस कॉलद्वारे तक्रार करण्यासाठी 022-50897100 हा क्रमांक असून महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी मोबाईलवर MREG टाईप करून त्यानंतर स्पेस देऊन आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करावा आणि 9930399303 या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवावा.
या पद्धतीने किंवा www.mahadiscom.in या संकेतस्थळावरील कंज्युमर पोर्टल, महावितरणचे मोबाईल ॲप अथवा 1912, 1800-212-3435, 1800-233-3435 या टोल-फ्री क्रमांकांवर मोबाईल क्रमांक नोंदवता येतो. याशिवाय NOPOWER टाईप करून व स्पेस देऊन बारा अंकी ग्राहक क्रमांक टाकावा. हा एसएमएस 9930399303 या क्रमांकावर पाठवून खंडित वीजपुरवठ्याची माहिती देता येईल.
स्वयंचलित प्रणालीद्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदवून ग्राहकांना संदेश पाठवण्यात येतो. संबंधित क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्वयंचलित प्रणालीमार्फत सूचना जाऊन वीजपुरवठा सुरळीत केला जातो. याशिवाय महावितरणचे मोबाईल ॲप तसेच टोल फ्री क्रमांकावर खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच ग्राहक महावितरणच्या वेबसाईटवरील वेब सेल्फ सर्व्हिसवरही खंडित वीजपुरवठ्याची माहिती देऊ शकतात.
पावसाळ्यात वादळवाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. तथापि, ग्राहकांनी 15 ते 20 मिनिटे वाट पाहूनच महावितरणला माहिती द्यावी. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी तातडीने धाव घेतात. संबंधित अभियंते व कर्मचाऱ्यांना वारंवार फोन केल्यास त्यांच्या कामात व्यत्यय येण्याची शक्यता असते.
त्यामुळे ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना फोन करण्याऐवजी टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप, एसएमएस किंवा मिस कॉल सुविधेचा वापर करावा; जेणेकरून महावितरण कर्मचाऱ्यांना काम करणे सुलभ होईल आणि वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करता येईल, असे महावितरणने कळवले आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यास तक्रार करण्यासाठी वापरा हे पर्याय
टोल फ्री क्रमांक : 1912, 1800-212-3435, 1800-233-343
मिस कॉल : 022-50897100 (केवळ नोंदणीकृत मोबाईलवरून)
एसएमएस : 9930399303 क्रमांकावर NOPOWER <स्पेस> <बारा अंकी ग्राहक क्रमांक> हा संदेश पाठवा
महावितरणचे मोबाईल ॲप