न्यूज डेस्क : मराठा आंदोलकांवर उघडपणे भाष्य करणारा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जाणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या हल्ल्याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी आरक्षण प्रकरणी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावरच टीका केली होती. तर आता आक्रमक होत हीच का तुमच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या? पेलणार नाही, झेपणार नाही ते हेच होतं का? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी या हल्ल्यावरून मराठा आंदोलकाचा कोणताही हात नसल्याचे स्पष्ट केलंय. हा हल्ला कुणी केला माहीत नाही. आमचे आंदोलक असं काही करणार नाही, असं सांगतानाच अशा प्रकारच्या हल्ल्याचं आम्ही समर्थन करत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, हल्ल्याबाबत मला काहीच माहीत नाही. कोण आहेत? काय आहेत? माहीत नाही. हल्ल्याबाबत मला मीडियाच्या माध्यमातून कळलं. कुणाच्या गाडीला धक्का लागलाय की लावलाय माहीत नाही. पण मराठा समाज शांततेत आंदोलन करतोय. हजारो गावात आंदोलन होतेय. आताही करत आहे. आमचं आंदोलन चालूच राहणार आहे. त्यात काही दुमत नाही. सरकारने गांभीर्याने घेऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
वाहनांची तोडफोड झाली, त्याचं समर्थन करत नाही. मराठा समाज शांततेतच आहे. त्याला आवरण्याचा प्रश्नच नाही. मराठा समाज शांततेत आहे, शांततेत राहील. तो वेगळं आंदोलन करणार नाही. कुणी हल्ला केला माहीत नाही. पण तो कोणत्याही समाजाचा असो. मराठ्यात माणुसकी जिवंत आहे. ज्याच्यावर हल्ला झाला, ज्यांनी हल्ला केला मग ते कोणत्याही समाजाचे असोत आम्ही या हल्ल्याचं समर्थन करत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केली.. सदावर्ते हे मराठा आरक्षणाच्या विरोधातील सुप्रीम कोर्टातील याचिकाकर्ते आहेत. #MarathaReservation #Maharashtra pic.twitter.com/aPMFtQ4FCh
— Abhijit Karande (@AbhijitKaran25) October 26, 2023