Monday, December 23, 2024
Homeराज्यमुख्यमंत्र्यांकडून दिव्यांग युवकाला तातडीची मदत...

मुख्यमंत्र्यांकडून दिव्यांग युवकाला तातडीची मदत…

..अन् दिव्यांग संदेशच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले… 

मुंबई – मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मुख्यमंत्री सामान्यांना भेटून त्यांच्या निवेदनावर, अर्जावर कार्यवाहीचे निर्देशही देतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कनवाळू स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा सर्वांना आला..

भेटीसाठी आलेल्या बांधकाम मजूर असलेल्या आणि अपघातात दोन्ही पाय, एक हात गमावलेल्या जव्हारच्या संदेश पिठोले याला मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीचा पाच लाखांचा धनादेश दिला…मुख्यमंत्र्यांच्या वागणुकीने भारावून गेलेल्या संदेशच्या आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले…

मुख्यमंत्री मंत्रालयात बैठकीसाठी आल्यावर त्यांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सामान्य नागरिक येत असतात. त्यांना प्रत्येकाला भेटल्याशिवाय मुख्यमंत्री श्री. शिंदे मंत्रालय सोडत नाही.

सामान्यांसाठी कल्याणकारी योजना राबवितानाच त्याची गतिमान अंमलबजावणी  करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे नेहमीच आढावा बैठकांमधून प्रशासनाला निर्देशही देत असतात.

आज दुपारी बाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात आगमन झाले. नियोजित बैठका सुरू झाल्या…लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिक देखील त्यांना भेटायला आले होते. या गर्दीत पालघर जिल्ह्यातील जव्हारचा संदेश पिठोले त्याच्या वडिलांसह मुख्यमंत्र्यांना भेटायला आला होता.

मुख्यमंत्र्यांचे लक्ष व्हिलचेअरवर बसलेल्या संदेशकडे गेले. विधि व न्याय विभागाच्या आढावा बैठकीसाठी जात असताना संदेशजवळ थांबून मुख्यमंत्र्यांनी त्याची विचारपूस केली आणि ते समिती कक्षात आले. विधी व न्याय विभागाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी त्या संदेशला बोलावले. त्याच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी संदेशला तातडीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांना बोलावले. तत्काळ संपूर्ण प्रक्रिया झाली. धनादेशावर संबंधित अधिकाऱ्यांनी तिथेच मुख्यमंत्र्यांसमोरच स्वाक्षरी केली आणि संदेशच्या हातात पाच लाखाचा धनादेश मुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला.

बांधकाम मजूर असलेल्या संदेशचा कामावर असताना अपघात झाला. त्यात त्याचा एक हात आणि दोन्ही पाय गमावले. आपल्या तरुण मुलाला व्हिलचेअरवरून आणाव्या लागलेल्या पित्याला मुख्यमंत्र्यांनी दिलासा देत तातडीने मदतीचा धनादेश दिला.

शिवाय संदेशला कृत्रिम पाय, हात बसविण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे मंगेश चिवटे यांना समन्वय करण्याच्या सूचनाही दिल्या. व्यवसायासाठी स्टॉल सुरू कर. त्यासाठी पालघर येथे जागा देण्यासाठी मदत करतानाच बांधकाम महामंडळाकडून संदेशला मदत देण्याबाबतही कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: