दिनांक २ ते ४ डिसेंबर रोजी पांचगणी येथे झालेल्या फेस्टिव्हल मध्ये आर्ट आणि क्राफ्टचे वैविध्यपूर्ण कलाविष्कारांनी नटलेले सर्वांगसुंदर कलादालनाने पर्यटकांना एका वेगळ्या विश्वात रममान केले होते.
या कलदालनामध्ये रोटेरियन नितीन (भाई) भिलारे आणि त्यांचे सहकारी मित्र रो. सुनील धनावडे, कवी ज्ञानेश सूर्यवंशी, रो.अशोक पाटील, रो.संजय आंब्राळे व रो.महेंद्र पांगारे यांनी दालनाच्या सुशोभिकरणासाठी आणि त्यात प्रदर्शित होणाऱ्या एकूण एक कलेची मांडणी अहोरात्र झटून अत्यंत कुशलतेने केली होती. पांचगणी फेस्टिवल म्हणजे चैतन्याचा झरा, मनाला आल्हाददायक आणि ताजेतवाने करणारा अपूर्व आणि अप्रतिम सोहळा!
या फेस्टिवल मध्ये अबालवृद्ध रसिकांना आकर्षित करणारा कार्योत्सव म्हणजे आर्ट आणि क्राफ्टचे वैविध्यपूर्ण कलाविष्कारांनी नटलेले सर्वांगसुंदर कलादालन! कलादालनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रख्यात कलाकारांची, काष्ठ्यशिल्पकारांची, चित्रकारांची मांदियाळी होती.
कोलाड, रायगड येथील जगप्रसिद्ध काष्ठ्यशिल्पकार रमेश घोणे यांची ओळख कलारसिकांना नसेल तर नवलच होईल. त्यांच्या जन्मजात आणि प्रतिभासंपन्न कलेने त्यांची ओळख सातासमुद्रापार केंव्हाच पोहोचवली आहे. तीस वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी या कलेसाठी समर्पित केला आहे. निसर्ग संपदेने नटलेल्या सर्वांगसुंदर पांचगणी’च्या शीतल गारव्यात पांचगणी फेस्टिवलचे यंदाचे हे पाचवे वर्ष होते.
बारामती येथून आलेले राहुल लोंढे एक उत्कृष्ठ काष्ठशिल्पकार आणि अफलातून बासरीवादक. ईश्वरी देणगी लाभलेले कलासक्त राहुल लोंढे यांची प्रत्येक शिल्पे अतिशय बोलकी असून जणू काही आपल्याशी मूक संवाद साधत आहेत असा भास होत होता.
कुंचल्यांच्या वापराविना रंगांचा अफलातून आविष्कार साधणारी नुपूर लोंढे ही पुण्यातील आर्टिस्ट कदाचित एकमेव असावी. रंगांचा वैविध्यपूर्ण आणि कलात्मक आविष्कार अगदी शिताफीने आणि अलगदतेने कसा साधावा हे नुपूर लोंढे यांचे प्रात्यक्षिक पाहिले की सहज लक्षात येते. दैनंदिन वापरातील वस्तू, दागिने, पेपर स्ट्रॉ यांसारख्या नानाविध वस्तू वापरून रंगांच्या अजब दुनियेतील आविष्काराची रंगबिरंगी सफर घडवून आणण्यासाठी नुपूर लोंढे यांच्या कलादालनास आवर्जून भेट द्यावी.
स्थानिक कलाप्रेमी चित्रकार संताजी बिरामणे आणि उमेश उंबरकर यांची अतिशय सुंदर आणि अफलातून चित्र निर्मिती आणि पेंटिंगस सर्वांच्या हृदयाचा अलगद ठाव घेत होती.
मानवी जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी योग साधनेचे महत्त्व अनादिकालापासून भारतीय संस्कृतीतून विषद केले आहे; परंतु अगदी हसत-खेळत, झेंबे अर्थातच डमरू हे त्याचे पौराणिक नाव या वाद्यांच्या अफलातून लयीतून प्रेक्षकांना तालबद्ध ठेक्याने मंत्रमुग्ध करणारे अनिकेत आंबवले यांचे नितांतसुंदर, श्रवणीय वादन आणि सोबतीला मानसोपचारतज्ञ योगिता तोडकर यांचे मनाला उभारी देणारे समुदेशन शब्दातीत होते. एकूण सर्व अप्रतिमच होते.
कोल्हापूर येथील प्रसिद्ध चित्रकार हर्षद कुलकर्णी यांच्या दुर्मिळ पेंटिंग्ज आणि अप्रतिम चित्रांचे संकलन तर प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेणारे होते. मिलिंद सरनाईक यांची कला आणि पाचगणीकर यांचे नाते आणि ऋणानुबंध पूर्वाश्रमीचे आहेत असे म्हणायला हरकत नाही. आपण कल्पनाही करू शकत नाही इतके सुंदर काष्ठशिल्प आणि काष्ठयचित्रे तयार करण्याचा त्यांना दांडगा व्यासंग आहे.
संगमनेर येथून आलेले सोमनाथ चौधरी यांचे पानावर कोरून अद्भुत चित्र आणि काव्य रेखाटण्याचे कौशल्य शब्दातीत आहे. पुण्यातील विनीत केंजळे यांचेकडे पाचशे पेक्षा अधिक विंटेज बाइक्सचा संग्रह आहे. त्यातील नव्वद टक्के पेक्षा अधिक बाइक्स अत्यंत चांगल्या चालू अवस्थेत असून पूर्णतः सुस्थितीत आहेत. येथील विश्वजित शिंदे यांनी साकारलेले स्मरण चित्र आणि देवराई आर्ट, पांचगणी यांनी दगड आणि धातूपासून बनवलेले शिल्प या आर्ट गॅलरीचे आकर्षण होते.
मोशी, पुणे येथील धैर्यशील बोदडे यांनी तयार केलेल्या विभिन्न राजमुद्रा अनेकांच्या पसंतीस उतरले. एकप्रकारे ऐतिहासिक वारसा जपण्याचा सुंदर प्रयत्न त्यांच्या या राजमुद्रा निर्मिती कलेतून सर्वांना परिचित होतो. पुणे येथील एरो स्पोर्ट्स अससोसिएशन यांच्या सहयोगाने एयरो मॅाडेलींग फ्लाईंगच्या इलेक्ट्रिक व ट्रेनर प्लेन यांनी टेबल लँड येथ हवेत घेत जेट्स , फायटर्स अशा छोट्या इंजिनवर उडणारी व बॅटरीवर उडणारी विमाने ही सर्व रेडीओ द्वारे नियंत्रीत करताना पर्यटकांना एक न्यारा आनंद मिळत होता.
मुंबई, पुणे व कोल्हापुरहून आलेल्या मॅाडेल फ्लायर्सनी यात सहभाग घेतला होता व उत्तम कौशल्याचे प्रदर्शन केले. असोसिएशन चे प्रमुख सर्वश्री अमित धेंडे, सचिन पाटील, नितीन शहाडे व रूपेश बलसारा अविश्रांत प्रयत्नाने कार्यक्रम उत्तम झाला. प्रेक्षकांनी प्रचंड उत्साहाने प्रतिसाद दिला. प्रेक्षकातील लहान मुलांना त्यांच्या प्रश्नांना माहीती पुर्ण उत्तरे दिली.
पांचगणी फेस्टिवलच्या कलादालनात वैशिष्ठ्यपूर्ण ठरले ते म्हणजे प्रथितयश कवी ज्ञानेश सूर्यवंशी यांनी त्यांच्या शीघ्र कवितेच्या माध्यमातून केलेले आभार प्रदर्शन! कलादालनात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे नाव कवितेमध्ये नमूद करून सूर्यवंशी सरांनी एका अनोख्या पद्धत्तीने स्वागत केले आणि सर्वांची मने जिंकून घेतली.
छाया सीमा खंडागळे….