Tuesday, October 15, 2024
Homeराज्यवाकाजी महाराजांच्या नवस फेडीचा द्वारका उत्सव जल्लोषात साजरा...उमरा गाव जपतोय साडेतीनशे वर्षांची...

वाकाजी महाराजांच्या नवस फेडीचा द्वारका उत्सव जल्लोषात साजरा…उमरा गाव जपतोय साडेतीनशे वर्षांची परंपरा…

संजय आठवले आकोट

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आकोट तालुक्यातील उमरा गावाने अतिशय श्रद्धा आणि अभिमानाने गत साडेतीनशे वर्षांपासून जतन केलेला वाकाजी महाराजांच्या नवस फेडीचा द्वारका उत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला. कोरोना काळात गत दोन वर्षापासून बंद असलेल्या या उत्सवामध्ये दरवेळेपेक्षा यावेळी बैल व भाविकांच्या संख्येत विलक्षण वाढ पहावयास मिळाली.

श्री संत वाकाजी महाराज हे उमरा गावाचे ग्रामदैवत मानले जाते. तीनशे ते साडेतीनशे वर्षांपूर्वी उमरा हे गाव डोंगराळ भागातील अतिदुर्गम ठिकाणी वसल्यासारखेच होते. वाहतुकीची साधने अगदी बोटावर मोजणे इतकी. त्यामुळे सर्वसामान्यांचा सारा भरोसा आपल्या पायांवरच. कुठेही जाण्यासाठी पायपिटी खेरीज पर्याय नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा महिनो न महिने आकोट शहराशी संपर्कच होत नसे. अशा स्थितीत माणसे असोत की जनावरे, यांची प्रकृती बिघडल्यास त्यावर उपचारासाठी काय करावे? कुठे जावे? हा मोठाच प्रश्न. अशा कठीण काळात वैद्यराज म्हणून वाकाजी महाराजांनी उमरा वासियांना मदतीचा हात दिला. त्याकाळी उमरा गावाचे उपजीविकेचा एकच व्यवसाय तो म्हणजे शेती. त्यासाठी येथील सर्वच शेतकरी आपल्या घरी किमान दोन बैल तरी राखून असत. ह्या बैलजोडीवर अख्या शेतीची मदार. त्या काळात शेती विषयक अवजारांचा शोधच न लागल्याने मशागतीची सारी कामे बैल जोडीद्वारेच केली जात होती. त्यामुळे बैल येथील गावकऱ्यांचा पंचप्राण असे.

अशा स्थितीत बैल आजारी पडल्यास अथवा जखमी झाल्यास उपचाराची काहीच सोय नसल्याने शेतकरी स्वतःच अर्धमेला व्हायचा. अशा वेळेत दुःखी शेतकऱ्यांच्या मदतीला वाकाजी महाराज धावून आले. त्यांच्या औषधोपचाराने बैलाला आराम मिळू लागला. बैलाला साप डसला, बैल जखमी झाला किंवा अन्य आजाराने ग्रस्त झाला तरी तो वाकाजी महाराजांच्या हात गुणाने खडखडीत बरा होत असे. वाकाजी महाराजांची ही कीर्ती हा हा म्हणता पंचक्रोशीत पसरली. आणि बघता बघता वाकाजी महाराज या परिसरातील धन्वंतरी म्हणून प्रसिद्धीस आले.

महाराजांच्या हयातीतच आपल्या बैलाचा उपचार करून त्याला बरे करण्याबाबत शेतकरी नवस करीत असत हा नवस असे बैलाला मखरा खालून नेण्याचा बैल पुरता बरा झाल्यावर शेतकरी आपल्या बैलबांडीला आपल्या परीने सजवित असत त्याला रथ म्हणतात त्याच प्रकारे बैलालाही न्हाऊ माखू घालून सजवित असत. नंतर वाकाजी महाराजांचे पूजन करून त्या बैलाला बैलबांडीच्या सजविलेला रथात उभे करीत असत. नंतर हा रथ गावातून वाजत गाजत मिरवल्या जायचा. पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाणारी ही परंपरा, उमरा गावाने गत साडेतीनशे वर्षापासून आजतागायत जतन करून ठेवली आहे. आज वाकाजी महाराज हयात नसले, तरी त्यांचे मंदिराचे गाभाऱ्यातील अंगारा आजारी बैलास लावल्यास व नवस बोलल्यास तो खडखडीत बरा होतो ही पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची श्रद्धा आहे.

ह्या श्रद्धेपोटी आणि नवसपूर्ती करिता उमरा येथे द्वारका हा उत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा होतो. काळानुरूप बैलबंडी सजावटीमध्ये बदल झाला आहे. ती अधिकाधिक सुशोभित दिसण्यासाठी शेतकरी मोठा खर्च करतात. परंतु ह्या रथाकरिता मात्र अद्यापही अन्य कोणतेही वाहन न वापरता बैलबंडीचाच मान कायम आहे. शोभायात्रेत आता पारंपारिक वाद्यांना फाटा देण्यात येऊन त्यांची जागा हळूहळू आधुनिक वाद्ये घेऊ लागली आहेत. आपल्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात भजनी मंडळे तर आधुनिक वाद्यांच्या तालावर तरुणाई या शोभायात्रेत धुंद होताना दिसते. या नवसाचा खर्चही आता वाढला आहे. पूर्वी तुटपूंज्या साधनांनी सजवली जाणारी बैलबंडी आता महागड्या साधनांनी सजवली जाते. बैलाचा साजही महागडाच असतो. याखेरीज हि शोभायात्रा पाच ते सहा तास चालते. हा पूर्ण वेळ बैल रथात एकाच ठिकाणी उभा असतो. बैलबंडीच्या अरुंद जागेत त्याला हवी तशी शारीरिक हालचाल ही नीटपणे करता येत नाही. त्यासाठी चार माणसे या बैलाच्या दिमतीस ठेवलेली असतात. विशिष्ट तेलाने ही माणसे बैलाच्या पायांचा, त्याच्या पाठीचा सतत मसाज करीत राहतात. त्याने बैलाचे पायाला मुंग्या येत नाहीत व त्याचा उत्साह टिकून राहतो. ही शोभायात्रा संपल्यावर बैलस्वामीच्या घरी भंडाऱ्याचे आयोजन केलेले असते. नवसफेडीची ही परंपरा उमरा या गावाने गत साडेतीनशे वर्षांपासून आजच्या घडी पर्यंत मोठ्या श्रद्धा व अभिमानाने जिवंत ठेवली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: