शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव…
देवलपार – राजू कापसे
स्थानिक स्वामी विवेकानंद विद्यालय, देवलापर चे उपक्रमशील शिक्षक उल्हास वामनराव इटानकर यांना आज दिनांक ५ सप्टेंबर २०२४ ला शिक्षक दिनाच्या पर्वावर शिक्षण मंत्रालयातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करून सपत्नीक सत्कार करण्यात आला.
दिनांक ३ मार्च च्या शासन आदेशनुसार राज्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षणाची सूची प्रकाशित करण्यात आली. त्यासर्व शिक्षकांना शिक्षण विभागातर्फे परफॉर्मींग आर्ट सभागृह, नरिमन पॉईंट, मुंबई येथे पुरस्कार प्रदान सोहळा घेण्यात आला. यापरसंगी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी शिक्षक हा समाजाचा निर्माता असून देश घडविण्यात शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे असे प्रतिपादन केले. स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील उपक्रमशील शिक्षक उल्हास वामनराव इटनकर यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाल्याने आदिवासी भागाच्या शिरात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियता निर्माण केली. त्यांनी राबविलेले विद्यार्थ्यांचे वाढदिवस उपक्रम, भुकुंप पिडीतांसाठी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने राबविलेला समाज ऋण उपक्रम, बँड पथक, अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सुरू केलेली डिजिटल रूम हे राबवून त्यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला.
सोबतच 2009 मध्ये त्यांना शैक्षणिक साहित्य निर्मितीत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला होता.त्याच बरोबर निवडणूक साक्षरता उपक्रम, युवक पत्रकारिता, वर्ग ग्रंथालय, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांद्वारे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. श्री उल्हास इटनकर हे उत्कृष्ट वक्ते, गायक तसेच टेक्नॉसॉवी शिक्षक आहेत.
2024 मध्ये त्यांनी राज्य बाल वैज्ञानिक प्रदर्शनात दिव्यांग गटात वंश विलास मर्सकोल्हे या विद्यार्थ्यांसह सहभाग घेतला होता. त्यात त्यांनी राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच नवीन शैक्षणिक धोरण निर्मिती करण्यात कला शिक्षक तज्ञ म्हणूनही त्यांनी उत्कृष्ठ कार्य केलेले आहे.
त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना क्रंतिज्याती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याने संपूर्ण परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामध्ये इटानकर यांनी त्यांच्या धर्मपत्नी सौ सारिका इटानकर यांच्या सहकार्यामुळेच हे यश संपादन करता आले असे सांगितले.
या भरीव कामगिरीसाठी स्वामी विवेकानंद सेवा शिक्षण समिती नागपूरचे अध्यक्ष जयंत मुलमुले, सचिव डॉ. अरविंद जोशी, प्राचार्य जयंत देशपांडे, पर्यवेक्षिका रेणुका देशपांडे व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.