धारावी पुनर्विकासाच्या विरोधात काढला जाणारा उद्याचा मोर्चा धारावीकर नागरिकांचा नाही तर धारावीच्या विकासाला विरोध करणाऱ्यांचा मोर्चा आहे – मनोहर रायबागे – कोषाध्यक्ष, धारावी पुनर्विकास समिती
धीरज घोलप
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे स्वप्न होते की धारावी झोपडपट्टीचे नंदनवन व्हावे, धारावीकरांचा विकास व्हावा त्यासाठी त्यावेळच्या मुख्यमंत्री मनोहर जोशींना एक योजना तयार करण्यास सांगितली आणि एसआरए योजनेचा जन्म झाला. पण संपूर्ण मुंबईचा एसआरए योजनेअंतर्गत विकास होत असताना धारावीला आजपर्यंत या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले.
इतकी सरकारे येऊन गेली, पण धारावीचा विकास कुणीही केला नाही. याआधीचे सरकार असताना आम्ही प्रत्येक धारावीकर नागरिकाला ४०० स्क्वे. फुटांचे घर मिळावे अशी मागणी करत होतो. त्यावेळेस इथल्या आमदारांनी व खासदारांनी २२५ स्क्वे. फुटांच्या वर घर देता येणार नाही असे निक्षून सांगितले होते.
पण आज जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार धारावीकरांना ४०० स्क्वे. फुटांचे घर देऊन धारावीचा विकास करण्यास तयार आहेत, तर हेच लोक ५०० स्क्वे. फुटांची मागणी करून सरकारचा व धारावी पुनर्विकासाचा विरोध करत आहेत. ५०० स्क्वे. फुटांच्या मागणीसाठी धारावीच्या पुनर्विकासाला विरोध करणारे उद्धव ठाकरे यांनी ते स्वतः मुख्यमंत्री असताना धारावीकरांना ५०० स्क्वे. फुटांचे घर का नाही दिले.
मातोश्री १ नंतर मोतोश्री २ देखील उभे राहिले, धारावीचा विकास जे बाळासाहेबांचे स्वप्न होते, तो त्यांनी केला नाही किंवा त्या दृष्टीने पाऊले उचलली नाहीत. धारावीच्या नावावर यांनी फक्त मतांचे राजकारण केले पण धारावीचा विकास करावा, असे यांना कधी वाटले नाही आणि आज धारावीचा विकास होत असताना हे याला विरोध करत आहेत.
धारावीकरांना पक्षाशी आणि राजकारणाशी काहीही घेणेदेणे नाही, धारावीचा आणि धारावीच्या नागरिकांचा विकास व्हावा हीच आमची मागणी आहे हेच आमचे ध्येय आहे, असे वक्तव्य धारावी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष रमाकांत गुप्ता यांनी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. धारावी पुनर्विकास समितीतर्फे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळेस त्यांच्या सोबत धारावी पुनर्विकास समितीचे कोषाध्यक्ष आणि चर्मकार नेते मनोहर रायबागे, सरचिटणीस राजीव चौबे, उद्योगपती भास्कर शेट्टी, व्यावसायिक वकील शेख आणि प्रवीण जैन उपस्थित होते.
धारावी पुनर्विकासाचे कोषाध्यक्ष मनोहर रायबागे यावेळेस म्हणाले की, मागील १९ वर्षांत धारावीचा विकास करण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार धारावीचा विकास व्हावा म्हणून खऱ्या अर्थाने प्रयत्न करत आहेत व त्यादृष्टीने ते धारावीचा विकास करण्यासाठी विकासकाला घेऊन आले. धारावीचे नागरिक हे कष्टकरी लोक आहेत, त्यांना इतर गोष्टींशी काहीही घेणेदेणे, धारावीचा विकास व्हावा, प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्काचे ४०० स्क्वे. फुटांचे घर मिळावे, हीच त्यांची एकमेव मागणी आहे आणि त्यांच्या पुनर्विकासासाठी सरकारने जे पाऊल उचलले आहे ते परिपूर्ण विचार करून उचलले आहे.
पण काही लोक या पुनर्विकासाच्या कामात नको त्या गोष्टी, नको त्या अफवा पसरवून संभ्रम निर्माण करत आहेत आणि होणारी योजना होऊ नये म्हणून आंदोलने करत आहेत. इतकी वर्षे यांनी धारावीत राजकारण करून आमदारकी, खासदारकी उपभोगली, त्यावेळेस यांनी धारावीचा काय विकास केला, धारावीकरांसाठी काय केले, हे त्यांनी सांगावे.
धारावी पुनर्विकासाला विरोध करणारे फक्त वैयक्तिक श्रेयासाठी धारावीच्या विकासाला विरोध करत आहेत, त्यांना धारावीकरांच्या विकासाशी काही घेणे देणे नाही. याचे श्रेय या विद्यमान सरकारला मिळू नये म्हणून उद्या हे धारावी पुनर्विकासाच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत. धारावी पुनर्विकासाच्या विरोधात काढला जाणारा उद्याचा मोर्चा धारावीकर नागरिकांचा नाही तर धारावीच्या विकासाला विरोध करणाऱ्यांचा मोर्चा आहे.
धारावी येथील उद्योजक आणि समाजसेवक भास्कर शेट्टी यावेळेस म्हणाले की, धारावी पुनर्विकासाच्या अंतर्गत सरकारकडून नवा सर्व्हे केला जाणार आहे आणि त्या नुसार प्रत्येकाला त्याचे हक्काचे घर दिले जाणार आहे. तसेच धारावी हा विभाग तिथे चालणाऱ्या विविध प्रकारच्या उद्योगांसाठी ओळखला जातो. तिथल्या उद्योगांचा आणि दुकानदारांचा सर्व्हे करून त्यांचे धारावीमध्येच पुनर्वसन केले जाईल.
पण त्यामध्ये देखील फक्त ५७,००० घरेच पात्र केली जातील, बाकी सर्वाना अपात्र केले जाईल अशी अफवा पसरवली जात आहे. तसेच धारावीचा जर पुनर्विकास झाला तर धारावीत चालणारे उद्योगधंदे कायमचे बंद होतील अशी भीती जाणूनबुजून पसरवली जात आहे. पण हे सर्व चुकीचे आहे आणि धारावीच्या विकासाला खोडा घालण्याचे हे प्रयत्न आहेत.
धारावी येथील उद्योजक वकील शेख या वेळेस म्हणाले की, २००४ मध्ये धारावीमध्ये DRP प्रोजेक्ट आणला गेला. पण त्यामुळे धारावीत राहणारे नागरिक आजपर्यंत सुविधांपासून वंचित राहिले. या DRP मुळे धारावीत आजपर्यंत कोणतीही नवी शाळा उभी राहिली नाही, कोणतेही हॉस्पिटल उभे राहिले नाही, मुलांना खेळण्यासाठी मैदान उभे राहिले नाही. धारावीतील नागरिक आजही १०x १२ च्या झोपड्यात राहतो.
आम्हालाही वाटते की धारावीमध्ये चांगले घर असावे, चांगले हॉस्पिटल, चांगली शाळा असावी, चांगले रस्ते असावेत. धारावीच्या विकासाला विरोध करणाऱ्या विरोधक राजकारण्यांना एक सर्वसामान्य धारावीकर प्रश्न विचारतो की, इतकी वर्षे तुम्ही धारावीच्या नागरिकांना संभ्रमात ठेऊन फक्त मतांच्या राजकारणासाठी त्यांचा उपयोग केला, सत्तेची मलाई खाल्ली, त्या धारावीकरांच्या भविष्याचा तुम्ही कधीतरी विचार केलात का? आज जर सरकार धारावीचा विकास करू पाहत आहे, तर तुम्ही त्याला विरोध का करत आहात.