Friday, January 31, 2025
Homeराज्यउपचाराच्या नावाखाली दोन कुमारिकांना; अघोरी पुजेसाठी नेले जांबच्या जंगलात...

उपचाराच्या नावाखाली दोन कुमारिकांना; अघोरी पुजेसाठी नेले जांबच्या जंगलात…

पैशांचा पाऊस पाडण्याचा प्रकार, राजू महाराजाचाही नोंदवला जबाब

पातूर – निशांत गवई

अकोला शहरातील दारिद्रय रेषेखालील कुटंुबातील दोन आजारी कुमारिकांना उपचाराचे आमिष दाखवून अघोरी पूजेसाठी पातूर शिवारातील जांब येथील जंगलात नेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी करावयाच्या अघोरी पुजेसाठी जांब येथील कथित महाराजाच्या जाळ्यात आपण अडकल्याचा जबाब या दोन्ही मुलींनीच सोमवारी पोलिसात दिला आहे. दरम्यान, या प्रकरणातील कथित महाराज राजू महाराज याचाही जबाब पोलिसांनी नोंदवला. मात्र त्याने जबाबात काय माहिती दिली, हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.

घरी अठरा विश्व दारिद्रये असलेल्या या गरीब कुटुंबातील एक मुलगी सहा महिन्यांपासून अर्धांगवायूने त्रस्त होती तर दुसरीला महिनाभरापासून रक्ताच्या उलट्या होत होत्या. त्यांच्या असहायतेचा फायदा घेत राजू अवचार उर्फ राजू महाराज आणि त्याच्या अकोला व पातूर येथील साथीदारांनी त्या दोघींना अघोरी पूजेसाठी पातूरच्या जंगलातील शिवमंदिरात तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री नेले होते.

तिथे राजू महाराज आणि कथित डॉक्टरांसह अघोरी प्रयोग सुरू होता. हा प्रयोग तांदूळ फेकून पैशांचा पाऊस पाडण्याचा होता, असे सांगितले जाते. दरम्यान, कारंजा, पुसद, मेडशी, पातूर आणि अकोला येथून कथित भक्त मंदिराकडे निघाले होते.सावखेड येथील ग्रामस्थांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी त्यांनी गोधन चोरीचा समज करून टोळीच्या चारचाकी गाडीचा पाठलाग केला. वेगाने चालवलेली गाडी अनियंत्रित होऊन खड्ड्यात गेली.

गाडीतून उतरलेले तिघांपैकी दोघे हायवेच्या दिशेने पळून गेले, तर रहेमत खान हमीदखान (वय ४५) हा जंगलाच्या दिशेने पळाला. पाठलागाच्या गोंधळात तो खोल दरीत कोसळून त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे या प्रकाराला आळा

पातूर पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, अद्याप कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेले नाहीत. मृत्यूमागील नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. उपचाराच्या नावाखाली अशा प्रकारे फसवणूक होणे समाजासाठी धोकादायक आहे. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे या प्रकाराला आळा बसला, मात्र या घटनेने खळबळ उडवून दिली आहे.

शवविच्छेदन अहवाल आज मिळणार

महान येथील एक डॉक्टर अकोला येथील दोन युवती व जांब येथील मांत्रिक राजू महाराज यांचे जबाब नोंदवले आहेत. मंगळवारी वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाईची दिशा ठरवणार आहे. अद्यापपर्यंत शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला नाही. उद्या शवविच्छेदन अहवाल मिळण्याची शक्यता आहे
-हणमंत डोपेवाड, ठाणेदार, पातूर

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: