Sunday, December 22, 2024
Homeराज्यदोन चोरटे…चार मिनिटे…आणि आठ हजार रुपये…अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल…

दोन चोरटे…चार मिनिटे…आणि आठ हजार रुपये…अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल…

आकोट – संजय आठवले

आकोट दर्यापूर मार्गावरील ए मार्ट व दर्शन सिमेंट डेपो या दोन दुकानांमधून दोन युवकांनी हात साफ केला असून यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीवरून आकोट शहर पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने तोंडाला रुमाल बांधलेल्या या दोन चोरट्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

घटनेची हकीगत अशी कि, आकोट दर्यापूर मार्गावर कालवाडी फाट्या नजीक ए मार्ट आणि दर्शन सिमेंट डेपो ही दोन दुकाने एकमेकांना लगटून आहेत. दिनांक ५ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे हे दोन्ही दुकानदार नऊ वाजता दुकाने बंद करून घरी गेले. त्यानंतर दिनांक ६ फेब्रुवारी चे पहाटे फिरावयास आलेल्या चक्रधर खलोकर याला या दोन्ही दुकानांचे शटर वाकविलेले दिसले.

त्यामुळे त्याने दोन्ही दुकानदारांना त्याबाबत कळविले. दोघांनी आपल्या दुकानात पाहणी केली असता ए मार्ट या दुकानाच्या गल्ल्यातून नाणे व कागदी चलनाचे मिळून ८हजार रुपये लंपास झाल्याचे आढळून आले. तर दर्शन सिमेंट डेपोच्या गल्ल्यामधून दोन हजार रुपये चोरीस गेल्याचे दिसून आले.

ए मार्ट संचालक अनुप सुभाष अंबाळकर यांनी आपल्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामध्ये चित्रीत झाले आहे कि, दिनांक ६ फेब्रुवारीचे पहाटे ४.१७ वाजता ए मार्ट या दुकानाच्या शटर पाशी एक जण आला.

त्याने कुलूपाला हात लावून पाहिले. आणि तो लगेच मागे परतून शहराकडे गेला. त्यानंतर दोनच मिनिटात म्हणजे ४.१९ वाजता तो आपल्या मित्राला घेऊन परतला. लगेच त्या दोघांनी दुकानाचे शटर वाकवून सरपटत ४.२० वाजता दुकानात प्रवेश केला.

दुकानात गेल्यावर दोघांनीही गल्ला तपासला. आणि त्यातील नाणी व कागदी चलन आपल्याकडील पिशवीत भरले. परतताना त्यांना डीओ बॉडी स्प्रे दिसताच त्यांनी त्यातील चार-पाच नग हातातील पिशवीत टाकले. आणि केवळ दोन मिनिटातच म्हणजे ४.२१ वाजता दोघेही दुकानाबाहेर पडले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या ह्या चित्रफितीने एक विचित्र संयोग स्पष्ट झाला. तो म्हणजे दोन चोरटे चार मिनिटांचा वेळ आणि आठ हजारांची चोरी. चोरटे त्यांच्या दुचाकीवरून आकोट कडे जाताना दिसल्याने ए मार्ट मधील चोरीनंतर या चोरट्यांनी ॲड. विकास पिंपळे यांच्या दर्शन सिमेंट डेपो मधून दोन हजार रुपयांची चोरी केल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी अनुप सुभाष अंबाळकर यांचे तक्रारीवरून आकोट पोलिसांनी अज्ञात चोट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास स्वतः ठाणेदार तपन कोल्हे हे करीत आहेत.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: