नांदेड – महेंद्र गायकवाड
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांना नांदेड – पुणे हा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने करता यावा, खाजगी प्रवासी वाहतूकदारांकडून होणारी आर्थिक लूट थांबावी या अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा केला. त्यामुळे नांदेड पुणे दोन विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.
दरवर्षी दिवाळीच्या हंगामात नांदेड – पुणे प्रवास अत्यंत महागडा होतो. खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची लूट होते. नांदेड – पुणे प्रवासासाठी तीन हजार रुपयापर्यंत प्रावस भाडे आकारले जाते . त्यामुळे प्रवाशांची होणारी ही आर्थिक लूट आणि मानसिक कोंडी लक्षात घेता यावर्षी नांदेड – पुणे प्रवासासाठी विशेष रेल्वे सोडाव्यात अशी मागणी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे केली होती.
या मागणीच्या अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आले असून आता नांदेड – पुणे दिवाळी हंगामासाठी दोन रेल्वे सोडण्यात येणार आहेत. यामुळे नांदेडकरांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. दिवाळीचा आनंद अधिक देवगुणित व्हावा , प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा मानसिक आणि आर्थिक ताण येऊ नये या अनुषंगाने खा. चिखलीकर यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आहेत.