गडचिरोली – नक्षलवाद्यांच्या देशविघातक कृत्यांना गडचिरोली पोलीस दल नेहमीच सामोरे जाऊन आळा घालतात. याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सन २००६/०७ पासुन फरार असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना सुमारे एक वर्षांपासुन पाळत ठेवून हैद्राबाद येथून अटक केले आहे.
गडचिरोली चे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलाचे सपोनि. सचिन झनक व सपोनि. शिवहरी सरोदे यांच्या नेतृत्वात जवानांनी गोपनियरित्या अभियान राबवून दोन जहाल नक्षलवाद्यांना हैद्राबाद येथुन दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी अटक केली आहे.
त्यामध्ये पुरुष नक्षली नामे टुगे ऊर्फ मधुकर चिनन्ना कोडापे, वय ४२ वर्षे याचा समावेश असून तो उपपोस्टे मरपल्ली अंतर्गत येत असलेल्या मौजा बस्वापूर, तह. अहेरी, जि. गडचिरोली येथील रहीवासी आहे. तो अहेरी दलममध्ये सदस्य या पदावर भरती झाला असून, सन २००२ पासुन सिरोंचा दलममध्ये कार्यरत होता. तसेच सन २००६ पर्यंत अहेरी, जिमलगटटा व सिरोंचा दलममध्ये कमांडर पदावर कार्यरत राहुन दलम सोडुन फरार झाला होता.
त्याच्यावर ९ खुन, ८ चकमक, २ दरोडा, ४ जाळपोळ, १ खुनाचा प्रयत्न व १ इतर असे एकुण २५ गुन्हे दाखल आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने त्याचेवर एकुण ८ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. अटक करण्यात आलेली महिला नक्षली नामे शामला ऊर्फ जामनी मंगलु पुनम, वय ३५ वर्षे, ही बंडागुडम, बासागुडा, जि. बिजापूर (छत्तीसगड) येथील रहीवासी असून, ती अहेरी दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तीचेवर आजपावेतो १ खुन, ५ चकमक, १ जाळपोळ, १ दरोडा व १ इतर असे एकुण ०९ गुन्हे दाखल आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने तीचेवर एकुण ०२ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.