मुंबई – गणेश तळेकर
ही गोष्ट आहे, वाय वाय आणि पीजे या दोन कलाकारांची. दोघही व्यावसायिक नाटक, चित्रपट आणि मालिका यामधे अभिनय करताहेत पण खूप मोठे नट होण्याचे त्यांचे स्वप्न अजून पूर्ण झालेले नाही. आणि म्हणून ते मोठं होण्यासाठी ते स्ट्रगल करताहेत. खरंतर या दोघांच्या करिअरची सुरूवात पारावरच्या तमाशातून सोंगाड्या म्हणून झालेली आहे आणि ते लोकप्रिय मालिकांपर्यंत पोहचलेलेही आहेत पण माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला नेहमी आपण आहोत त्यापेक्षा आणखी मोठे व्हायचे असते.
कारण प्रत्येकाच्या यशाच्या संकल्पना वेगळया असतात. वाय आणि पीजेला सिरीयल सिनेमातून बरं पैसे पैसे मिळायला लागतात. पैसा मोठा की समाधान आणि नाव मोठं याविषयी दोघांच्या मनात सर्वसामान्य माणसाप्रमाणेच गोंधळ वाढतो, मग ते स्टेटस वाढवण्यासाठी महागड्या कार घेतात. मोठे अलिशान फ्लॅट घेतात, बंगले घेतात इतकच काय दोघही फार्महाऊसेस घेतात. ही फिल्म इंडस्ट्री अतिशय बेभरवशाची असते इथं भल्याभल्याचं होत्याचे नव्हते होते. वाय वाय आणि पीजे याच गर्तेत सापडतात.
अचानक काही सिरीयल बंद होतात, नाटक चालत नाहीत. पण ते हार मानत नाहीत ते या परिस्थितीतही पुन्हा उभं राहण्याचा विचार करतात. सिनेमा करण्याचे ठरवतात. सिनेमा पूर्ण करतात पण पुढे काय होतं हे नाटकातच पाहिलेलं बरं.
त्यांना या सगळया प्रवासात पैसे आणि समाधान मिळत नाही पण एक गोष्ट नक्की मिळते, त्यांना आयुष्य आणि आयुष्यातील सुखाचा अर्थ मात्र कळतो आणि हो त्यांना अचानक एके क्षणी सुखी माणसाचा सदरा सापडतो. तसा हा गंभीर विषय पण आनंद म्हसवेकरांनी दोन विनोदी नटांच्या आयुष्याची गोष्ट केल्यामुळे ती गोष्ट अतिशय रंजक होते आणि हसवता हसवता एक सुखाचा संदेश देऊन हे नाटक संपते.
नाटकाचे प्रयोग मुंबई बाहेर छोटया सेंटरमध्ये करायचे असल्यामुळे नेपथ्याचे अवडंबर नाही. नाटकाची गरज असेल तेवढे सुटीत सेटींग आहे. सुखदा भावे दाबके यांचे टायटल साँग आणि पार्श्वसंगीत प्रयोगाची रंगत वाढवते. मुकेश जाधव आणि प्रणव रावराणे या दोन विनोद विरांनी नाटकात जान ओतून अभिनय केला आहे.
सव्वा दोन तास रंगमंच सतत खळखळून हसवत ठेवण्याची किमया ते करतात. अमृता रावराणे आणि निखिला इनामदार या दोन गुणी अभिनेत्रींनी दोन सोंगाडयाना ताकतीने साथ दिलीय. एकूण नाटक विनोदी करमणूक करणारे असूनही प्रेक्षक सुख आणि आनंद यांचा मंत्र घेऊन बाहेर पडतो.