सांगली – ज्योती मोरे.
सध्या विविध साखरकारखान्याच्या गळीत हंगामासाठी लागणारी तोडणी वाहतूक यंत्रणा उभारली जात आहे. त्याकरिता ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडी मालक हे नोटरी कराराच्या आधारे लाखो रुपये ऊस तोडणी करता मुकादम व मजुरांना देत असतात.
त्याचबरोबर कारखाना चालू होण्याच्या दरम्यान सदर तोडणी कामगारांच्या टोळ्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी करिता उतरवल्या जातात. सदर तोडणी कामगारांना दिलेली रक्कम ते आपल्या कामातून परतफेड करण्याची प्रचलित पद्धत आहे.गेल्या काही वर्षांपासून काही मुकादम आणि मजूर जाणून-बुजून बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांच्या मोठ्या रकमा उचल करून वाहतूकदारांची फसवणूक करत आहेत.
सदर ट्रक,ट्रॅक्टर मालक मुकादमांना व मजुरांना शोधण्यासाठी गेल्यास ते सापडत नाहीत. त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागत नाही. अनेक वेळा ऊस तोडणी मजूर व मुकादम यांचा शोध घेण्यास ट्रक, ट्रॅक्टर मालक गेले असता, त्यांना मारहाणी सारखे प्रकारही घडले आहेत. या विरोधात आवाज उठवण्यासाठी आज भाजपा नेते पृथ्वीराज भैय्या पवार यांच्या नेतृत्वाखाली अशा वाहतूकदारांचा सांगलीत मोर्चा काढण्यात आला. सांगलीतील स्टेशन चौकात सदर मोर्चाची सांगता झाली.
दरम्यान महाराष्ट्र शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, कायद्यातील त्रुटी सुधारल्या जाव्यात, महाराष्ट्र शासना कडून यासाठी एक समिती अथवा महामंडळ नेमण्यात यावे. अशा मागण्या पृथ्वीराज पवार यांनी केल्या आहेत. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य शेखर इनामदार, भाजपा नेते माजी आमदार नितीन शिंदे, आदी मान्यवरांसह वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.