Monday, December 23, 2024
Homeराज्यचीन मधील साम्यवादी राजवटीची तानाशाहीकडे वाटचाल - प्रा. डॉ. सतीश रामदासजी महल्ले...

चीन मधील साम्यवादी राजवटीची तानाशाहीकडे वाटचाल – प्रा. डॉ. सतीश रामदासजी महल्ले…

नरखेड – जगभरातील अनेक देशांमध्ये साम्यवादी विचारांचे पक्ष आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत असताना चीनमध्ये मात्र 70 वर्षापेक्षा जास्त काळापासून साम्यवादी पक्षाची सत्ता आहे. सध्या चीन आणि अमेरिकेत जागतिक महासत्ता होण्यासाठी चढाओढ सुरू आहे. या चढाओढीमुळे जागतिक राजकारण मात्र चांगलेच तापले आहे. अशा जागतिक अशांततेच्या वातावरणात चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या 20 व्या अधिवेशनामध्ये पुन्हा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची तिसऱ्यांदा निवड निश्चित मानली जात आहे.

कारण चीनच्या साम्यवादी पक्षाने एका व्यक्तीला केवळ दोन टर्म अध्यक्षपदाची संधी देणारे कलम शी जिनपिंग यांनी घटनेतून काढून टाकले आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे आपल्या देशाच्या सीमा विस्तारण्याच्या वेडाने सध्या पछाडले आहे. त्यामुळे चीन साम्यवादी पक्ष हळूहळू तानाशाही कडे वाटचाल करताना दिसत आहे. याच अनुषंगातून चिनी साम्यवादी पक्षाच्या प्रवासाचा चढउतारांचा मागोवा समजून घेणे गरजेचे आहे.

रशियात 1917मध्ये लेनिनच्या नेतृत्वात पहिली साम्यवादी क्रांती झाली. या क्रांतीचे पडसाद जगभरात उमटले. चीनही त्याला अपवाद नव्हता संपूर्ण चीनला एकत्र करण्यासाठी मार्क्सवादाशिवाय पर्याय नाही अशी भावना चीनमध्ये निर्माण झाली. आणि 1919 मध्ये साम्राज्यवाद आणि सामंतशाही विरोधात आंदोलन सुरू झाले. त्यामुळे कामगार चळवळ अतिशय मजबूत होऊन चीनमध्ये 1921 मध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली.

जुलै 1921 मध्ये चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे पहिले अधिवेशन शांघायमध्ये पार पडल्यानंतर, चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासात 1934 मधील लॉंग मार्च यास खास महत्व प्राप्त आहे. हा लॉन्ग मार्च माओ त्त्से तुंग आणि चाऊ एनलाय यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता. यामध्ये चांग काई शेकच्या नेतृत्वातील कुमिंगतांग पक्षाच्या सैन्याने कम्युनिस्टांच्या लाल सैन्याला मागे ढकलले होते.

1937 मध्ये चीनवर जपानने हल्ला केला त्यावेळी कम्युनिस्ट आणि कुमिंगतांग पक्षाचे सैन्य एकत्र आले आणि जपानचा पराभव केला. या विजया नंतर चीनमध्ये गृहयुद्ध सुरू झाले. यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचा विजय होऊन संपूर्ण चीनमध्ये माओ त्त्से तुंगच्या नेतृत्वाखाली 1949 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरकार स्थापन झाले. गृहयुद्धातील पराभवनंतर चांग काई शेकच्या नेतृत्वातील सरकारने चीन भूमीतून जीव वाचवण्यासाठी एका बेटावर आश्रयीत झाले. या बेटाला आज तैवान म्हणून ओळखले जाते.

माओ त्त्से तुंग यांनी 1966 मध्ये चीनमधील राजकीय आंदोलनाचा एक भाग म्हणून सांस्कृतिक क्रांतीची सुरुवात केली. जवळपास दहा वर्षापर्यंत ही क्रांती सुरू होती. चीनच्या राजकारणांमध्ये, अर्थकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये असणाऱ्या काही भांडवलवादी प्रवृत्तींनी त्या काळात तोंड वर काढायला सुरुवात केली होती. या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये ही सांस्कृतिक क्रांती सुरू झाली होती.

या भांडवलवादी प्रवृत्तीचा पूर्णपणे बिमोड करणे भांडवलवाद्यांच्या प्रभावातून चीनला मुक्त करणे आणि संपूर्ण चीनमध्ये साम्यवादाची पकड मजबूत करणे हा या सांस्कृतिक क्रांती मागचा उद्देश होता. यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांना, कामगारांना आणि नंतर सैन्याला आळीपाळीने वापरण्यात आले. ज्या ज्या ठिकाणी भांडवली तत्वे आढळली तेथे तेथे त्यांचा अतिशय हिंसक पद्धतीने बिमोड करण्यात आला. लाखो लोकांना तुरुंगात डांबण्यात आले हजारो लोकांना मारण्यात आले.

एकंदरीतच अत्यंत क्रूर आणि हिंसक पद्धतीने ही चळवळ चीनमध्ये राबवली गेली होती. साम्यवादांची पकड मजबूत करण्याबरोबरच चीनवरील परकीय किंवा भांडवलवादांचा प्रभाव चीनमध्ये येऊ नये यासाठी नियोजनबद्ध आखणी करून केलेले हे कृत्य होते.

1976 मध्ये माओ त्त्से तुंग यांच्या निधनानंतर सत्तेवर आलेल्या डेंग झियाओ पिंग यांच्या कार्यकाळात साम्यवादी पक्षाचा मोठा विस्तार करण्यात आला. आणि कोट्यावधी लोकांना पक्षाचे सदस्य बनवण्यात आले. त्यामुळे हा पक्ष म्हणजे सत्ता आणि पक्षाचे नेते म्हणजे सत्ताधारी हे समीकरण चीनमध्ये दृढ झाले. त्यांच्याच काळात बंदिस्त अर्थव्यवस्थेकडून खुल्या अर्थव्यवस्थेकडे चीन वळला. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था कृषीप्रधानतेकडून उद्योगप्रधानतेकडे परिवर्तित झाली.

पण आज आर्थिक दृष्ट्या चीन पूर्णपणे बदललेला असला तरी राजकीय दृष्ट्या विचार करता माओ त्त्से तुंगच्या काळातील चीन आजही तसाच दिसून येतो. माऊंनी सांस्कृतिक क्रांतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीची राजकीय व्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला होता. त्याच स्वरूपाची राजकीय व्यवस्था चीनचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून आणण्याचा प्रयत्न होत आहे.

माओनी ज्याप्रमाणे साम्यवादाची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे शी जिनपिंग हे आपला व्यक्तिगत प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा आणि साम्यवादांची पकड घट्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. चीनमधील साम्यवादी पक्ष कोणत्याही स्वरूपाचा असंतोष, निषेध, विरोध सहन करत नाही खऱ्या अर्थाने विरोधक अशी संकल्पनाच त्यांना मान्य नाही. व्यवस्थे विरोधात बोलणाऱ्यांना दडपून टाकलं जातं आहे. मीडिया इंटरनेट आणि अगदी सोशल मीडियावरही चीनमध्ये साम्यवादी पक्षाचं पूर्ण नियंत्रण आहे.

शी जिनपिंग यांच्या अतिमहत्वकांक्षे मुळे आशिया खंडातील बहुतांश देशांमध्ये चीनच्या वाढत्या विस्तारवादी विषयी असुरक्षितता निर्माण झालेली आहे. आज भारत, तिबेट, जपान, तैवान देशांसोबत चीनने सीमावाद उकरून काढलेले आहेत. यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याची भाषा चीन करत आहे.

वन बेल्ट वन रोड या महत्वकांक्षी प्रकल्पामुळे काही आशियातील राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा संकोच होत आहे. एकंदरीत प्रत्येक प्रश्न चिघळत ठेवून युद्धाच्या माध्यमातून सोडवायचा ही तानाशाही मानसिकता चीनला आज पूर्णपणे बदलण्याची गरज आहे. तरच भविष्यात चीनला जागतिक महासत्ता बनणे अवघड जाणार नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: