अमरावती – दुर्वास रोकडे
शेतकऱ्यांचा शेती मशागतीवरील खर्च कमी व्हावा यादृष्टीने शेत बांधावर प्रयोगशाळा स्थापन करुन अल्प खर्चात शेतातच नैसर्गिक खते व औषधे तयार करावीत तसेच ग्रामीण भागातच रोजगार निर्मितीचे तंत्रज्ञान विकसीत करण्याच्या दृष्टीने कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांच्या संकल्पनेतून व कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिले प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर रविवारी (4 ऑगस्ट रोजी) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी प्रशिक्षण केंद्र, शिवाजी कृषि महाविद्यालय येथे संपन्न झाले. जिल्ह्यातील सुमारे तीनशे शेतकरी बांधवांनी या शिबिराला उपस्थिती लावून तज्ज्ञांकडून संबंधित विषयाची माहिती जाणून घेतली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अमरावतीचे विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे, नागपूरचे विभागीय विभागीय कृषि सहसंचालक शंकर तोटावर होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोल्याचे डॉ. सतीश निचळ, डॉ. मंगेश दांडगे, डॉ. राजीव घावडे, डॉ. संतोष चव्हाण, विकास सावरकर आदींनी शिबिरात उपस्थित शेतकरी बांधवांना शेतातच नैसर्गिक खते व औषधे तयार करण्याविषयी प्रक्रिया, साधन सामुग्री व फायदे याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्न व शंकांचे निरसनही तज्ज्ञ मार्गदर्शनकांकडून करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन पुरवठा व मूल्य साखळी तज्ज्ञ निलेश राठोड यांनी केले. कार्यक्रमास कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र गायकवाड, स्वीय सहायक अतुल बुटे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठातील संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र प्रमुख प्रा.डॉ.दिलीप काळे, राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी उज्वल आगरकर, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच तीनशे अधिक शेतकऱ्यांची भर पावसात उपस्थिती होती.