आकोट- संजय आठवले
आकोट बाजार समितीमध्ये कापसाची आवक वाढत असतानाच व्यापाऱ्यांनी अचानक चालू खरेदी बंद पाडून आपण कापूस खरेदी करण्यास असमर्थ असल्याचे समिती प्रशासनाला कळविल्याने पुढील तजविज होईपर्यंत कापूस खरेदी बंद ठेवण्याचा समिती प्रशासनाने निर्णय घेतला आहे. ह्या दरम्यान शेतकरी पॅनलच्या नेत्यांनी मुख्य प्रशासकांचे कक्षात ठिय्या आंदोलन करून कापूस खरेदी त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. सोबतच चालू खरेदी बंद करण्यामागे शहरातील बांधून तयार असलेली व्यापाऱ्यांची खाजगी बाजार समिती सुरळीत करण्याचा व्यापाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांच्या या आडमुठेपणाने कापूस उत्पादक शेतकरी मात्र चांगलेच अडचणीत आल्याचे चित्र आहे.
यंदा वरूण राजाच्या अवकृपेने कपाशीचे पीक चांगलेच अडचणीत आलेले आहे. अशा स्थितीत धोक्यात आलेली कपाशी अतिशय मेहनतीने काही प्रमाणात वाचविण्यात शेतकऱ्यांनी यश संपादन केले आहे. यातील कापूस आता बाजार समितीमध्ये येऊ लागला आहे. विशेष म्हणजे हा कापूस अगदी ‘फ्रेश’ आहे. मात्र व्यापाऱ्यांनी या कापसाला बट्टा लावून ह्यात ओला व खराब कापूस असल्याची ओरड केली. आणि असा कापूस परत केल्या जाईल असे समिती प्रशासनाने सौदा पट्टीवर नमूद करावे असा आग्रह केला. परंतु असे केल्याने व्यापारी शेतकऱ्यांच्या कापसाला कवडीमोल भाव देतील असे सांगून समिती प्रशासनाने सौदा पट्टीवर ओला व खराब कापूस परत केल्या जाईल असे लिहिण्यास ठाम नकार दिला. ह्या नकाराने व्यापाऱ्यांनी दिनांक ६ डिसेंबर रोजी कापसाची चालू खरेदी अचानक बंद केली.
या समयी समिती प्रांगणात २५/३० वाहने उभी होती. त्यातील ५/६ वाहनातील कापूस खरेदी करून व्यापाऱ्यांनी असहकार पुकारला. त्यावर बाजार समितीचे मुख्य प्रशासक गजानन पुंडकर आणि सचिव दाळू यांनी व्यापाऱ्यांना चर्चेकरिता आमंत्रण दिले. मात्र व्यापारी आले नाहीत. त्यामुळे बाजार प्रांगणातील २०/२१ वाहनांची मोठी पंचायत झाली. ती दूर करण्याकरता मुख्य प्रशासक आणि सचिव यांनी दर्यापूर बाजार समितीची संपर्क करून या वाहनातील कापूस स्वीकारण्याची विनंती केली. दर्यापूर समितीने त्याला संमती दर्शविल्याने ही वाहने दर्यापूर समितीमध्ये पाठवली गेली. दुसरीकडे वृत्तपत्रात त्वरित जाहिरात देऊन पुढील आदेशापर्यंत कापूस खरेदी बंद असल्याचे समितीने घोषित केले. त्यानंतर आज दिनांक ६ डिसेंबर रोजी मुख्य प्रशासक व सचिव यांनी चर्चेकरिता व्यापाऱ्यांना पुन्हा आमंत्रित केले. मात्र व्यापाऱ्यांनी हे आमंत्रण धूडकावून लावले. त्याने व्यथित होऊन मुख्य प्रशासक व सचिव यांनी जिल्हा उपनिबंधक अकोला यांना परिस्थितीची माहिती दिली. आणि पुढील तजविज करण्याची विनंती केली आहे. येत्या दोन दिवसात ही तजवीज होण्याची शक्यता आहे.
ह्या प्रकाराची माहिती मिळताच शेतकरी पॅनलचे नेते प्रदीप वानखडे, डॉक्टर गजानन महल्ले, डॉक्टर प्रमोद चोरे, एडवोकेट मनोज खंडारे, डॉक्टर पुरुषोत्तम दातकर, हरिदास चेडे, केशव बाजारे, सुनील होपळ, सुनील अंबळकार, लखन इंगळे, नितीन तेलगोटे, प्रशांत वानखडे यांनी समितीचे मुख्य प्रशासक यांचे कक्षात ठिय्या आंदोलन करून कापूस खरेदी त्वरित सुरू करण्याची मागणी केली. त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आरोप केला की, शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असून व्यापाऱ्यांनी बांधलेली दुसरी बाजार समिती सुरळीत करण्याकरिता व्यापार्यांनी टाकलेला हा डाव आहे. वाचकांना माहीत असावे की, पोपटखेड मार्गावरील दिवाळीबेन सेदाणी कॉन्व्हेंटच्या उत्तरेस काही व्यापाऱ्यांनी खाजगी बाजार समिती उभारली आहे. गत तीन-चार वर्षांपासून या ठिकाणी शेतमालाची आवकच नसल्याने ही समिती बंदच आहे. आता कापसाचे निमित्ताने ही बाजार समिती मार्गावर आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. ही समिती सुरू झाल्यास तिथे व्यापाऱ्यांना निरंकुश व्यवहार करता येणार आहेत.
खाजगी समितीवर शासनाचे नियंत्रण असणार नाही. त्यामुळे ही बाजार समिती सुरळीत करण्याचा व्यापाऱ्यांचा प्रयास आहे. आतील गोम ही आहे की, ह्या बाजार समितीमध्ये आमदार प्रकाश भारसाकळे यांचा अप्रत्यक्ष हितसंबंध दडलेला आहे. त्यांच्या गळ्यातील ताईत असलेला ईसम या समितीमध्ये संचालक आहे. ही समिती उभारण्याकरिता त्याचा मुख्य पुढाकार असून त्यात आमदार भारसाकळे यांचा सिंहाचा अप्रत्यक्ष वाटा आहे. शहरात कोठेही कामे सुरू नसताना आमदार भासाकळे यांनी आपल्या निधीतून ह्या बाजार समितीमध्ये जाणाऱ्या मार्गावर लहान लहान तीन पूल बांधून दिलेले आहेत. जनतेचा या पूलांशी सुतराम संबंध नसताना हे तीन पूल मात्र जनहितार्थ बांधल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. असे असताना ही बाजार समिती बंद असणे हा आमदारांचा दुर्लौकिक आहे. त्यामुळे यंदा हा बाजार सुरू करण्याचा व्यापारी वर्गाने चंग बांधला असल्याचे जाणकारांचे मत आहे. परंतु शासकीय नियंत्रण असलेल्या बाजार समितीतच शेतकऱ्यांची पिळवणूक करण्यास व्यापारी भीत नाहीत, तेथे या निरंकुश खाजगी बाजारात शेतकरी पूर्णतः नागविला जाण्याची सादर भीती आहे. त्यामुळे शासकीय बाजार समितीतच कापूस खरेदी प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची मागणी शेतकरी पॅनलने केली आहे. या संदर्भात त्यांनी बाजार समिती सचिवांना दिलेल्या पत्रावर समिती सचिवांनी कापूस खरेदी सुरू करण्याकरता दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय होते याबाबत कूतूहल निर्माण झालेले आहे.