देशात टोमॅटोचे वाढते दर सामन्यांच्या नाकीनऊ आले आहेत. तर कर्नाटकात एका महिला शेतकऱ्याच्या शेतातून टोमॅटो चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. एका महिला शेतकऱ्याने दावा केला आहे की, तिच्या शेतातील अडीच लाख रुपये किमतीचे टोमॅटो चोरट्यांनी चोरून नेले आहेत. याप्रकरणी महिला शेतकऱ्याने हळेबिडू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ANI या दिलेल्या वृत्तसंस्थेनुसार, महिला शेतकऱ्याने आरोप केला आहे की, हसन जिल्ह्यातील तिच्या शेतातून ४ जुलैच्या रात्री २.५ लाख रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला गेले. देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडलेले असताना हा प्रकार घडला आहे. टोमॅटो पिकवण्यासाठी कर्ज घेतल्याने आपले मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी धारणी यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, “आम्हाला बीन पिकाचे मोठे नुकसान सोसावे लागले होते आणि दुसरे पिक टोमॅटो पिकवण्यासाठी कर्ज घेतले होते. टोमॅटो भाव जास्त असल्याने तोडणी करणार होते. मात्र चोरट्यांनी टोमॅटोच्या 50-60 पोती चोरून नेले आणि उरलेले पीकही नष्ट केले.
धारणी या महिला शेतकऱ्याने दोन एकर जमिनीवर टोमॅटोचे पीक घेतल्याचे सांगून ते पीक घेऊन ते बाजारात नेण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. दुसरीकडे, एका पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, हळेबिडू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेलूर तालुक्यातील गोनी सोमनहल्ली गावात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला शेतकऱ्याने तिच्या शेतातून अडीच लाख रुपये किमतीच्या टोमॅटोच्या 50-60 गोण्या चोरीला गेल्याचे सांगितले आहे. हळेबिडू पोलिस स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही सुपारी आणि इतर व्यावसायिक पिकांच्या चोरीबद्दल ऐकले होते, परंतु टोमॅटो चोरल्याचे कधीच ऐकले नाही. आमच्या पोलिस ठाण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे.
बेंगळुरूमध्ये टोमॅटो 120 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे
कर्नाटकासह देशातही टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाली आहे. बंगळुरूमध्ये टोमॅटोचे दर 101 ते 121 रुपये प्रतिकिलो आहेत. मार्च आणि एप्रिलमध्ये तापमानात अचानक वाढ झाल्याने टोमॅटो पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे उत्पादनात घट झाली आणि बाजारभावात वाढ झाली.