नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड विष्णुपुरी येथील रुग्णालयातील रुग्ण मृत्यू प्रकरणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयात भेट दिली असता रुग्णालयातील अस्वच्छतेवरून त्यांनी अधिष्ठाता (डीन)वाकोडे यांना हातात झाडू देऊन शौचालय साफ करावयास लावले होते.
या प्रकरणी हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांच्या विरोधात रात्री उशिरा शासकीय कामात अडथळा व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यातर्गत ग्रामीण पोलिस ठाणे सिडको येथे विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 35 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर हिंगोलीचे खासदार तथा शिवसेनेचे (शिंदे गट) नेते हेमंत पाटील यांनी काल मंगळवार रोजी रुग्णालयात भेट देऊन रुग्णांना व नातेवाईकांना दिलासा दिला होता.
यावेळी रुग्णालयातील अस्वच्छतेवरून खा. हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे डीन डॉ. वाकोडे यांच्या हाती झाडू देत रुग्णालयातील शौचालय साफ करण्यास लावले होते. यावरून सोशल मीडिया व प्रसिद्धिमध्यावरून अनेकांनी चांगल्या व वाईट प्रतिक्रिया दिल्या. या प्रकरणी डॉ. वाकोडे यांनी खा. हेमंत पाटील यांच्या विरोधात तक्रार दिली असल्याने डीनला शौचालय साफ करावयास लावणे हे खासदारांना महागात पडले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.