नांदेड – महेंद्र गायकवाड
होळीनिमित्त सतत २२ व्या वर्षी होणारे महामुर्ख कविसंमेलनाची जय्यत तयारी झाली असून रविवार दि.२४ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत यावर्षी हळदी लिलाव शेड, नवा मोंढा नांदेड येथे होणाऱ्या या अनोख्या कविसंमेलनात शृंगारिक कविता व द्विअर्थी विनोदाने देशातील नामवंत कवी नांदेडकरांना हास्यरंगात भिजवून टाकणार असल्याची माहिती मुख्य संयोजक जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी दिली आहे.
संयोजन समितीमध्ये राजेशसिंह ठाकूर, शिवा लोट, बिरबल यादव, संपादक जुगलकिशोर धूत, जुगलकिशोर शुक्ला, शिवाजी पाटील,अनुराग जाजू, कामाजी पाटील यांचा समावेश आहे.दरवर्षी हे कवी संमेलन कला मंदिर मधील गंधर्व नगरी येथे होते. परंतु कलामंदिरची नूतन वास्तू तयार होत असल्यामुळे यावर्षी कवी संमेलन नवा मोंढा येथील हळदी लिलाव शेडमध्ये घेण्यात येणार आहे.
वाराणसी नंतर फक्त नांदेडमध्येच होळीच्या कविसंमेलनाचे आयोजन होलिका उत्सव समिती व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल द्वारे करण्यात येते.आगळ्यावेगळ्या या कवी संमेलनात भोपाळ मध्यप्रदेश येथील धूमकेतू, उत्तर प्रदेशचे तिरपट इलाहाबादी,अकोला येथील विनोद सोनी,लातूर येथील योगीराज माने, यवतमाळ येथील वसंतराव इंगोले यांना विशेष आमंत्रित करण्यात असून त्यांच्या अजब शैलीमुळे श्रोते लोटपोट होणार आहेत.
याशिवाय गेल्या अनेक वर्षापासून नांदेडचे महामूर्ख कवी संमेलन गाजविणारे हास्यसम्राट सिध्दार्थ खिल्लारे व शाहीर रमेश गिरी,चला हवा येऊ दे फेम सतीश कासेवाड,प्रा.रविंद्र अंबेकर पुणे,पत्रकार राजेंद्र शर्मा,रेश्माजी हिंगोले,सिनेस्टार लच्छु देशमुख,बजरंग पारीख,वैजनाथ जाधव,राजेंद्र उपाध्याय,सुरेश बामलवा,विलास जोगदंड हे होळीचा आनंद द्विगुणित करणार आहेत. मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, तेलंगाना मधील रसिक या कविसंमेलनाला आवर्जून उपस्थित असतात.
कार्यक्रमाचे स्थळ बदलले असल्यामुळे नवीन स्थळाची माहिती आपल्या सर्व मित्रांना देण्यात यावी. कार्यक्रम निशुल्क असला तरी १६ वर्षावरील पुरुषांनाच प्रवेश मिळणार आहे. जागा मर्यादित असल्यामुळे रसिकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक समितीतर्फे करण्यात आले आहे.